स्वतंत्र विदर्भाचा लढा तीव्र करणार

By Admin | Updated: August 11, 2016 01:20 IST2016-08-11T01:20:09+5:302016-08-11T01:20:09+5:30

स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सर्वात जुनी मागणी आहे. काँग्रेसने आजवर नेहमीच स्वतंत्र विदर्भ....

The struggle of independent Vidarbha will be intensified | स्वतंत्र विदर्भाचा लढा तीव्र करणार

स्वतंत्र विदर्भाचा लढा तीव्र करणार

 विदर्भवादी काँग्रेस नेत्यांचा निर्धार : भाजपचा दुटप्पीपणा जनतेसमोर उघडा पाडू
गडचिरोली : स्वतंत्र विदर्भ राज्याची मागणी सर्वात जुनी मागणी आहे. काँग्रेसने आजवर नेहमीच स्वतंत्र विदर्भ राज्याचे समर्थन केले आहे. भारतीय जनता पक्षाने निवडणूक काळात स्वतंत्र विदर्भ देऊ असे लेखी आश्वासन दिले. स्वतंत्र विदर्भाची निर्मिती झाल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही, असा निर्धार काँग्रेसच्या विदर्भवादी नेत्यांनी बुधवारी गडचिरोलीत जाहीर केला.
गडचिरोली येथे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आ. डॉ. नामदेव उसेंडी यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसह जिल्ह्यातील काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांची बैठक दुपारी १२ वाजता सुरू झाली. या बैठकीला माजी केंद्रीय मंत्री विलास मुत्तेमवार, माजी मंत्री डॉ. नितीन राऊत, शिवाजीराव मोघे, सतीश चतुर्वेदी, माजी खा. नरेश पुगलिया, मारोतराव कोवासे, माजी आ. आनंदराव गेडाम, डॉ. नामदेव उसेंडी, देवराव भांडेकर, विनोद दत्तात्रय, प्रकाश इटनकर आदी उपस्थित होते.
या बैठकीत विदर्भवादी काँग्रेस नेत्यांनी काँग्रेस पक्षाची भूमिका नेहमीच विदर्भाच्या बाजुने राहिली आहे. स्वतंत्र विदर्भ राज्य झाल्याशिवाय या भागाच्या विकासाला चालना मिळणार नाही. स्वतंत्र विदर्भ हा या भागातील जनतेच्या अस्मितेचा प्रश्न असून या प्रश्नावर काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींचेही मन वळविण्याचे प्रयत्न केले जातील. मात्र भारतीय जनता पक्षाने स्वतंत्र विदर्भाचे लेखी आश्वासन दिले आहे. या आश्वासनाची पूर्तता भाजपकडून होण्याची चिन्ह दिसत नाही. अधिवेशनात अखंड महाराष्ट्राचा ठराव घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. भाजपने अशी भूमिका ठेवल्यास भाजपला जनतेसमोर नागडे केले जाईल, असा खणखणीत इशारा ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांनी दिला. गेल्या दोन वर्षांच्या काळात केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे देशात धर्मांध शक्तीचा उद्रेक वाढला आहे. दलित, आदिवासी व मुस्लिम समाज दहशतीत आला आहे, अशी टीकाही काँग्रेस नेत्यांनी केली. या बैठकीत माजी खा. मारोतराव कोवासे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी यांनी गडचिरोली जिल्ह्याच्या विविध समस्या ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांसमोर मांडल्या. भारतीय जनता पक्षाने निवडणूक काळात जनतेला दिलेले आश्वासन पाळलेले नाही. जनतेचा प्रचंड भ्रमनिराश झाला असल्याचे त्यांनी सांगितले. काँग्रेस पक्ष संघटन आगामी काळात जिल्ह्यात मजबूत करण्यासाठी सर्व नेते एकदिलाने काम करणार असल्याचे माजी खा. कोवासे, डॉ. उसेंडी यांनी स्पष्ट केले. त्यानंतर माजी खा. मारोतराव कोवासे यांच्या निवासस्थानी ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांची पत्रकार परिषद झाली.
या पत्रकार परिषदेत बोलताना माजी मंत्री विलास मुत्तेमवार म्हणाले, विदर्भाची दयनिय अवस्था झाली आहे. अनेक समस्या ऐरणीवर आल्या असून शेतकरी देशोधडीला लागला आहे. विदर्भाची ही दैनावस्था आम्हाला थांबवायची आहे. त्यामुळेच काँग्रेसचे आम्ही नेते एकत्र आलो. आता सरकारच्या विरोधात लढा देणार असे सांगितले. माजी मंत्री डॉ. नितीन राऊत म्हणाले, भाजप पक्षाने विदर्भातील मुख्यमंत्री दिला. याशिवाय विदर्भातूनच सुधीर मुनगंटीवार हे वजनदार मंत्री भाजप सरकारने दिले आहेत. मात्र त्यांच्याकडूनही विकासाचे प्रयत्न होताना दिसून येत नाही. भाजप प्रणीत केंद्र व राज्य सरकारच्या काळात दलित, मुस्लिम व आदिवासींवर अन्याय, अत्याचार वाढले आहेत. समाजासमाजात तेढ निर्माण करण्याचे शासनाकडून षडयंत्र सुरू आहे, असेही ते म्हणाले. माजी मंत्री शिवाजीराव मोघे म्हणाले, विदर्भ हा एकेकाळी काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. सध्या विदर्भातून भाजपचे ४४ आमदार विधानसभेवर आहेत. अशा स्थितीतही विदर्भाच्या विकासाबाबत अन्याय सुरूच आहे, अशी टीका मोघे यांनी केली. वैदर्भीय जनतेच्या विकासासाठी विदर्भातील आम्ही काँग्रेसचे नेते एकत्र आलो असून आधी काँग्रेस पक्षाची मूठ बांधणार आहोत. पक्ष संघटन वाढवून विदर्भ विकासाच्या मुद्यावर भाजप पक्षाला आव्हान देणार आहोत, असेही मोघे यावेळी म्हणाले.
नरेश पुगलिया म्हणाले, स्वतंत्र विदर्भ राज्याचा काँग्रेसने नेहमी पुरस्कार केला. सदर मागणी आम्ही काँग्रेसच्या अखिल भारतीय अध्यक्ष सोनिया गांधी यांच्याकडेही करणार आहो, काँग्रेस पक्ष श्रेष्ठी विदर्भाच्या बाजुने कौल देईल, असा विश्वास आम्हाला आहे, काँग्रेस पक्षाची विदर्भासाठी स्वतंत्र प्रदेश काँग्रेस कमिटी निर्माण करण्याची गरज आहे व ही मागणी आम्ही श्रेष्ठींकडे ठेवणार आहो, असेही पुगलिया यांनी सांगितले.
काँग्रेसच्या या बैठकीला बाबासाहेब भातकुलकर, जेसा मोटवानी, केसरी पाटील उसेंडी, सतीश विधाते आदींसह कार्यकर्ते, तालुकाध्यक्ष, सर्व सेलचे अध्यक्ष उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: The struggle of independent Vidarbha will be intensified

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.