स्ट्राँग रूम सभोवताल पोलिसांचा कडक पहारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2019 22:38 IST2019-04-14T22:38:25+5:302019-04-14T22:38:42+5:30
गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. लोकसभेचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

स्ट्राँग रूम सभोवताल पोलिसांचा कडक पहारा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्रातील ईव्हीएम मशीन गडचिरोली येथील कृषी महाविद्यालयाच्या स्ट्राँग रूममध्ये जमा करण्यात आल्या आहेत. लोकसभेचा निकाल २३ मे रोजी लागणार आहे. तोपर्यंत या ठिकाणी शस्त्रधारी पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
देशभरात सात टप्प्यांमध्ये निवडणूक आटोपणार आहे. गडचिरोली-चिमूर लोकसभा मतदार संघाची निवडणूक पहिल्याच टप्प्यात पार पडली. त्यामुळे इतर ठिकाणचे मतदान होईपर्यंत येथील मतदारांना निवडणूक निकालाची प्रतीक्षा करावी लागणार आहे. निकालापर्यंत लोकसभा मतदार संघातील सर्व ईव्हीएम कृषी महाविद्यालयात ठेवण्यात आल्या आहेत. ज्या ठिकाणी ईव्हीएम ठेवण्यात येतात, त्या ठिकाणाच्या सभोवताल सुरक्षा दलाचा कडक पहारा आहे. ईव्हीएम मशीन कुठे ठेवाव्या, त्या सीलबंद कशा कराव्या, त्याच्या सभोवताल किती सेक्युरिटी असावी, याचे नियम निवडणूक विभागाने घालून दिले आहेत. याचे तंतोतंत पालन करीत सेक्युरिटी लावण्यात आली आहे.
इमारतीच्या समोरच पोलिसांनी तपासणी नाका उभारला आहे. ओळख दाखविल्याशिवाय महाविद्यालयाच्या परिसरात जाऊ दिले जात नाही. त्यानंतर इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वाराजवळही शस्त्रधारी काही पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. या पोलीस कर्मचाऱ्यांची शिफ्टप्रमाणे नेमणूक केली जाते.
या ठिकाणी २४ तास पहारा ठेवला जात आहे. पोलिसांना विश्रांतीसाठी टेंट लावण्यात आले आहे. त्यांच्या भोजनाचीही व्यवस्था त्याच ठिकाणी करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी, उपजिल्हाधिकारी व तहसीलदार या कर्मचाºयांची कंट्रोल रूमवर देखरेख राहणार आहे. सभोवताल असलेल्या पोलिसांमुळे कृषी महाविद्यालयाला छावणीचे रूप प्राप्त झाले आहे. या इमारतीमध्ये सीसीटीव्ही कॅमेरेही बसविण्यात आले आहेत. तसेच मेटल डिटेक्टरही लावण्यात आले असल्याने सुरक्षा आणखीच कडक झाली आहे.
प्रत्येक कामाची व्हिडीओ शुटींग
ट्रकमधून पेट्या उतरविणे, त्या स्ट्राँग रूममध्ये ठेवणे, त्यांची सील तपासणे या सर्व बाबींची व्हिडीओ शुटींग करण्यात आली आहे. एखाद्या उमेदवार किंवा नागरिकाने प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास त्याच्या शंकांचे निरसन व्हिडीओ शुटींगच्या माध्यमातून करता येईल. तसेच पारदर्शकतेसाठी व्हिडीओ शुटींग हा सर्वाधिक चांगला उपाय आहे.
कृषी महाविद्यालयाच्या सभोवताल पोलिसांचा कडक पहारा असल्याने ओळखीचे प्रमाणपत्र दाखविल्याशिवाय कृषी महाविद्यालयाच्या परिसरात सुध्दा प्रवेश करणे कठीण आहे.