महिलांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज बुलंद करा
By Admin | Updated: September 10, 2015 01:41 IST2015-09-10T01:41:38+5:302015-09-10T01:41:38+5:30
शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने महिला आरक्षण व महिलांच्या विविध प्रश्नांवर संघर्ष केला आहे.

महिलांच्या ज्वलंत प्रश्नांवर आवाज बुलंद करा
राष्ट्रवादी काँग्रेसचा महिला मेळावा : चित्रा वाघ यांचे राकाँ कार्यकर्त्यांना आवाहन
गडचिरोली : शरदचंद्र पवार यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने सातत्याने महिला आरक्षण व महिलांच्या विविध प्रश्नांवर संघर्ष केला आहे. महिलांना सुरक्षा, आरोग्य, त्यांचे हक्क व अधिकार मिळणे हा त्यांचा घटनादत्त अधिकार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे संघटन वाढविण्यासोबतच महिलांच्या विविध प्रश्नांवर कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून आवाज बुलंद करावा, असे रोखठोक आवाहन राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षा चित्रा वाघ यांनी केले.
राष्ट्रवादी महिला काँग्रेस जिल्हा गडचिरोलीच्या वतीने बुधवारी येथील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यालयात आयोजित महिला मेळाव्यात प्रमुख मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुरेश पोरेड्डीवार होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्याध्यक्ष रवींद्र वासेकर, माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम, राकाँच्या माजी महिला जिल्हाध्यक्ष पुष्पा अलोणे, प्रगती पाटील, माजी जि. प. अध्यक्ष हर्षलता येलमुले, प्राचार्य कविता पोरेड्डीवार, राकाँच्या माजी महिलाध्यक्ष मंजुषा विष्णोई आदी उपस्थित होते.
पुढे बोलताना चित्रा वाघ म्हणाल्या, मुख्यमंत्री असताना शरद पवार यांनी सर्वप्रथम महिलांसाठी धोरण आखले. त्यानंतर महिला आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली. पूर्वी महिलेच्या हाती पाळण्याची दोरी होती. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून अनेक महिला राजकारणात येत असून विविध पदावर काम करीत आहेत. त्यामुळे त्यांच्या हातात आता तिरंगा झेंड्याची दोरी आली आहे. महिलांना काम करण्यासाठी आता मोठी संधी आहे. महिलांनीच महिलांच्या प्रश्नांवर एक पाऊल पुढे टाकावे. राष्ट्रवादीचे आम्ही सर्व नेते त्यांना साथ देऊ, असेही त्या म्हणाल्या. खोटे आश्वासन देऊन सत्तेत आलेल्या भाजप प्रणीत सरकार महिलांच्या प्रश्नांवर गंभीर नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी महिलांना सतत जागृक ठेवावे. येत्या दोन महिन्यात राष्ट्रवादी महिला काँग्रेसच्या वतीने महिलाच्या प्रश्नांवर विविध आंदोलन व कार्यक्रम हाती घेण्यात येतील, असेही वाघ यावेळी म्हणाल्या. महिला व युवतींवरील अन्याय, अत्याचार आपण कदापी खपवून घेणार नाही, असा रोखठोक इशाराही त्यांनी यावेळी दिला.
याप्रसंगी सुरेश पोरेड्डीवार यांनी भाजप-सेना सरकारच्या विरोधात राकाँ कार्यकर्त्यांनी गावागावात जनजागृती करावी, सर्वसामान्यांचे काम करून पक्ष संघटन वाढवावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. माजी जि. प. अध्यक्ष भाग्यश्री आत्राम म्हणाल्या, गडचिरोली जिल्हा विकासात माजी गृहमंत्री तथा पालकमंत्री दिवंगत आर. आर. पाटील यांचे मोलाचे योगदान आहे. त्यामुळे गडचिरोलीच्या नव्या महिला व बाल रुग्णालयाला आर. आर. पाटील यांचे नाव देण्यात यावे, तसा पक्षाच्या वतीने शासनाला प्रस्ताव पाठविण्यात यावा, पेसा कायद्याच्या राज्यपालांच्या अधिसूचनेमुळे जिल्ह्यातील गैरआदिवासींवर मोठा अन्याय झाला आहे, असे अनेक प्रश्न जिल्ह्यात कायम आहेत. सदर प्रश्न मार्गी लावण्यासाठी राष्ट्रवादी महिला काँग्रेस आक्रमक पवित्रा घेणार असेही त्या यावेळी म्हणाल्या.
प्रास्ताविक पुष्पा अलोणे, संचालन सोनाली पुण्यपवार यांनी केले. तर आभार मनिषा सज्जनपवार यांनी मानले. (स्थानिक प्रतिनिधी)