गावातच वाद मिटवून पदाचे स्थान बळकट करा
By Admin | Updated: January 22, 2017 01:39 IST2017-01-22T01:39:32+5:302017-01-22T01:39:32+5:30
महसुली व दंडाधिकारी प्रकरणात तसेच कायदा व सुव्यवस्थेतही पोलीस पाटलांचे मोठे सहकार्य लाभते.

गावातच वाद मिटवून पदाचे स्थान बळकट करा
पोलीस पाटील दिन समारंभ : कौस्तुभ दिवेगावकर यांचे पोलीस पाटलांना आवाहन
गडचिरोली : महसुली व दंडाधिकारी प्रकरणात तसेच कायदा व सुव्यवस्थेतही पोलीस पाटलांचे मोठे सहकार्य लाभते. पोलीस पाटील हा गावाचा आरसा आहे. त्यामुळे पोलीस पाटलांनी गावातील तंटे गावातच मिटवावे. तसेच आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत आचारसंहितेचे पालन व कायदा तसेच शांतता ठेवण्यासाठी पोलीस पाटलांनी प्रशासनाला सहकार्य करून पोलीस पाटलाचे स्थान बळकट करावे, असे आवाहन गडचिरोलीचे उपविभागीय अधिकारी तथा सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी केले.
महाराष्ट्र राज्य गांव कामगार पोलीस पाटील तालुका संघटना गडचिरोलीच्या वतीने शनिवारी स्थानिक पोलीस ठाण्यात आयोजित पोलीस पाटील दिन समारंभ तथा सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार कार्यक्रमात ते उद्घाटक म्हणून बोलत होते. यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून पोलीस निरिक्षक विजय पुराणिक, पोलीस उपनिरिक्षक सत्यवान भूयारकर, संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे, जिल्हाध्यक्ष हरिहर खरकाटे, आरमोरी तालुकाध्यक्ष नरेंद्र बनपुरकर, चामोर्शी तालुकाध्यक्ष अनिल कुकुडकार आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे बोलताना कौस्तुभ दिवेगावकर म्हणाले, पोलीस पाटील हे शासनाचे प्रतिनिधी आहेत. आगामी जि.प. व पं.स. निवडणूक शांततेत पार पाडण्यासाठी उपविभागीय कार्यालयात स्वतंत्र कक्ष निर्माण करण्यात आले आहे. तसेच आचारसंहिता उल्लंघनाच्या तक्रारी नोंदविण्यासाठी पोलीस पाटलांनी फोन, ईमेल व मॅसेजद्वारे माहिती द्यावी, संबंधितांवर तत्काळ कारवाई केली जाईल. निवडणुकीत कोणालाही दारूचे वाटप करू देऊ नका, एसडीओ कार्यालयाशी सतत संपर्क ठेवा, असे आवाहन दिवेगावकर यांनी यावेळी केले. याप्रसंगी ठाणेदार विजय पुराणिक यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाला गडचिरोली, धानोरा, चामोर्शी तालुक्यातील पोलीस पाटील हजर होते. (स्थानिक प्रतिनिधी)
मंडळ अधिकारी कार्यालयात निवासासाठी व्यवस्था करणार
सन १९९२ पासून पोलीस पाटील भवनासाठी प्रशासनाकडून जागा मिळत नसल्याची बाब पोलीस पाटील संघटनेचे उपाध्यक्ष शरद ब्राह्मणवाडे यांनी लक्षात आणून दिली. यावर उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावर यांनी पोलीस पाटील भवनासाठी जागा मागणी बाबतच्या प्रस्तावाचा सविस्तर अभ्यास करून निर्णय घेण्यात येईल. तसेच पोलीस पाटलांना कामानिमित्त गडचिरोलीत राहण्यासाठी तात्पुरती व्यवस्था म्हणून मंडळ अधिकारी कार्यालयाच्या इमारतीत एक स्वतंत्र खोली देणार, अशी ग्वाही दिवेगावकर यांनी यावेळी दिली.
४याशिवाय सर्व पोलीस पाटलांना ओळखपत्र महिनाभरात देण्यात येईल. तसेच गडचिरोली उपविभागाच्या धानोरा व गडचिरोली तालुक्यातील पोलीस पाटलांची रिक्त पदे भरण्याची कार्यवाही लवकरच करण्यात येईल, अशी माहिती दिवेगावकर यांनी यावेळी केली.
सेवानिवृत्त पोलीस पाटलांचा सत्कार
गडचिरोली तालुक्यातील शिवणी येथील सेवानिवृत्त पोलीस पाटील रमेश देशमुख यांचा एसडीओ दिवेगावकर व ठाणेदार पुराणिक यांच्या हस्ते शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व साडीचोळी देऊन सपत्नीक सत्कार करण्यात आला.