नक्षल्यांशी लढणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाला महिला शक्तीचे बळ
By Admin | Updated: March 8, 2015 00:50 IST2015-03-08T00:50:35+5:302015-03-08T00:50:35+5:30
नक्षलवाद्यांशी मागील ३०-३२ वर्षांपासून पोलीस दल सक्षमपणे लढा देत आहे. या लढ्यात आतापर्यंत अनेक पोलीस शहीद झालेत. यामध्ये सात ते आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे.

नक्षल्यांशी लढणाऱ्या गडचिरोली पोलीस दलाला महिला शक्तीचे बळ
महिला दिन विशेष
दिगांबर जवादे गडचिरोली
नक्षलवाद्यांशी मागील ३०-३२ वर्षांपासून पोलीस दल सक्षमपणे लढा देत आहे. या लढ्यात आतापर्यंत अनेक पोलीस शहीद झालेत. यामध्ये सात ते आठ महिला पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. असे असताना अतिशय धैर्याने गडचिरोली पोलीस दलाच्या विविध हुद्यांवर महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी काम करीत आहेत. गडचिरोली पोलीस दलाच्या वाहनताफ्यात जवळजवळ २८ महिला पोलीस कर्मचारी वाहनचालक म्हणून काम करीत आहेत. तर गडचिरोली शहर वाहतूक शाखेतही १० पैकी सात महिला पोलीस कार्यरत आहेत. याशिवाय अनेक पोलीस ठाण्यांमधील महिला कर्मचारी आपले कर्तव्य अतिशय चोखपणे बजावीत आहेत. हे पोलीस दलासाठी गौरव ठरले आहे.
नक्षल्यांचा बंदोबस्त करण्याबरोबरच त्यांच्या कारवायांवर नियंत्रण ठेवण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात सीआरपीएफ, एसआरपीएफ, स्थानिक पोलीस जवान, सी-६० चे जवान व सॅगचे असे एकूण १० हजारापेक्षा जास्त जवान तैनात आहेत. हे जवान जंगलात जाऊन नक्षलविरोधी अभियान राबवितात.
आजपर्यंत सर्वाधिक घातपाताच्या घटना पोलीस वाहनांवर हल्ला करूनच झाल्या आहेत. त्यामुळे जंगलात नक्षल्यांशी लढण्याऐवढेच या भागातून वाहन चालविणेही तेवढेच धोकादायक व जीवावर बेतणारे काम मानल्या जाते. त्यामुळे वाहनचालकाचे काम स्वीकारण्यास सहजासहजी जवान तयार होत नाही. मात्र काही जिगरबाज महिला पोलिसांनी हे आव्हान स्वीकारले आहे.
गडचिरोली पोलीस दलात एकुण २८ महिला पोलीस वाहनचालक आहेत. या वाहनचालकांना नागपूर येथील मोटार परिवहन विभागात सहा महिन्याचे वाहन चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर त्यांची वाहन चालविण्याची चाचणी घेऊन वाहन चालविण्याचा परवाना देण्यात आला. येथील काही महिला वाहनचालक गडचिरोली पोलीस मुख्यालयात आहेत. तर काही दुर्गम भागात असलेल्या पोलीस स्टेशन, पोलीस चौकीत कार्यरत आहेत.
तीन वर्षांपूर्वी गडचिरोली शहरासाठी स्वतंत्र वाहतूक नियंत्रण शाखा निर्माण करण्यात आली. या नियंत्रण शाखेत वाहतूक अधिकाऱ्यासह एकूण १५ पदे मंजूर आहेत. यापैकी जवळपास १० ते १२ पदे नेहमीच भरली राहतात.
पोलिसांचे समायोजन होण्यापूर्वी वाहतूक नियंत्रण शाखेत १० पुरूष वाहतूक पोलीस व एकच महिला वाहतूक पोलीस होते. त्यामुळे अवैध पध्दतीने एखादी महिला वाहन चालवत असेल तर सदर वाहनचालक महिलेवर कारवाई करताना फार मोठ्या मर्यादा पुरूष वाहतूक पोलिसांना येत होत्या. कित्येकदा महिला वाहनधारकावर कारवाई न करताच सोडूनही द्यावे, लागत होते.
दिवसेंदिवस पुरूषांबरोबरच महिला वाहनधारकांचीही संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे इतर विभागाप्रमाणेच वाहतूक शाखेतही किमान ५० टक्के महिला पोलीस असणे गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेऊन पोलीस अधीक्षकांनी गडचिरोली वाहतूक शाखेला तब्बल सात महिला पोलीस उपलब्ध करून दिले आहेत. पुरूष वाहतूक पोलिसांची संख्या आता केवळ तीनवर येऊन थांबली आहे.
नक्षलविरोधी अभियानातही पोलीस दलात महिला सहभागी होत आहे व जंगलात फिरून गस्त घालताना अनेकदा त्या दिसून येत आहे.
याशिवाय पोलीस दलाला बळकटी देण्याच्या कामात महिला पोलीस पुरूषांसारखीच जबाबदारी उचलत आहे. त्यामुळे गडचिरोली पोलीस दलातील या महिला निश्चितच अभिमानास्पद कामगिरी करीत आहे.