आष्टीतील रस्ते झाले बकाल
By Admin | Updated: October 22, 2014 23:18 IST2014-10-22T23:18:48+5:302014-10-22T23:18:48+5:30
चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.

आष्टीतील रस्ते झाले बकाल
आष्टी : चामोर्शी तालुक्यातील आष्टी येथील मुख्य मार्गासह अंतर्गत रस्त्यांची दुर्दशा झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे.
आष्टी हे जिल्ह्यातील मध्यवर्ती शहर मानल्या जाते. आष्टी येथूनच चंद्रपूर, आलापल्ली, सिरोंचा, मुलचेरा, चामोर्शीकडे मार्ग जातात. त्यामुळे बहुतांश बसेस आष्टीवरूनच पुढील प्रवास करतात. आष्टी येथे असलेल्या पेपर मिलमुळेही वाहनांची वर्दळ नेहमीच सुरू होते. चंद्रपूर जिल्ह्यातून आलेल्या प्रत्येकच वाहनाला आष्टी येथूनच जावे लागते. आष्टी येथून चंद्रपूरकडे राज्य महामार्ग गेला आहे. मात्र या महामार्गाची या पावसाळ्यात मोठी दुर्दशा झाली. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस या खड्ड्यांमधील माती, गिट्टी, डांबर उखडून जात असल्याने खड्यांचा विस्तार होत चालला आहे. त्याचबरोबर त्यांची खोलीही वाढत चालली आहे. खड्ड्यामुळे आजपर्यंत अनेक लहान-मोठे अपघातही घडले आहेत. त्यामुळे या मार्गाची दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांकडे केली जात आहे. मात्र त्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष होत असल्यान खड्डे जैसे थेच आहेत. आष्टी गावातील शिरपूरवार यांच्या घराजवळ रस्त्याची दुरवस्था झाली आहे.
आष्टी ही परिसरातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. गावातील अंतर्गत रस्त्यांची निर्मिती करणे व त्यांची देखभाल करण्याची जबाबदारी जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागावर आहे. मात्र मागील वर्षी आष्टी येथील अनेक रस्त्यांची दुरूस्ती करण्यात आली नाही. त्यामुळे रस्त्यावरची गिट्टी निघाली आहे. बऱ्याच ठिकाणच्या रस्त्यांची डांबर व मातीचा रस्ता यांची तुलनाच करणे अशक्य झाले आहे. रस्ते दुरूस्तीबाबत जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला अनेक वेळा कळविण्यात आले. मात्र पावसाळा सुरू झाला असल्याचे कारण पुढे करून रस्ते दुरूस्ती करण्यात आली नाही. आता पावसाळा संपून हिवाळ्याला सुरूवात झाली आहे. तरीही या मार्गांची दुरूस्ती करण्यात आली नाही.
आष्टी परिसरातील बहुतांश गावांच्या रस्त्यांची हीच स्थिती झाली आहे. बकाल रस्त्यांमुळे गावातील नागरिक त्रस्त झाले आहेत. मात्र प्रशासनातील अधिकारी याकडे लक्ष देण्यास तयार नसल्याने रस्त्यांची परिस्थिती जैसे थेच असल्याचे दिसून येत आहे. निवडून येणारे लोकप्रतिनिधी केवळ मत मागेपर्यंत विकासाची भाषा करतात. एकदा निवडून आल्यानंतर निवडणुकीच्या कालावधीत त्यांनी दिलेल्या आश्वासनांचा त्यांनाच विसर पडत असल्याची टीका नागरिकांकडून होत आहे. आष्टी परिसरातील जिल्हा परिषद सदस्यांचीही हीच अवस्था झाली असल्याने रस्ते बकाल झाले आहेत. (वार्ताहर)