वीज ग्राहकांवर अतिरिक्त बिलाचा ताण
By Admin | Updated: October 27, 2014 22:36 IST2014-10-27T22:36:28+5:302014-10-27T22:36:28+5:30
वीज वितरण कंपनी वीज देयकांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट व फसवणूक करीत आहे. ग्राहक वीज बिल मिळाल्यानंतर अधिक चौकशी न करता, बिल भरून मोकळे होतात.

वीज ग्राहकांवर अतिरिक्त बिलाचा ताण
गडचिरोली : वीज वितरण कंपनी वीज देयकांच्या माध्यमातून ग्राहकांची लूट व फसवणूक करीत आहे. ग्राहक वीज बिल मिळाल्यानंतर अधिक चौकशी न करता, बिल भरून मोकळे होतात. याचाच फायदा घेत गाहकांच्या खिशावर डल्ला मारला जात आहे. विविध प्रकारचे कर आकारून ग्राहकांना आर्थिक त्रास दिला जात आहे.
महावितरणद्वारे दरमहा वीज आकार देयकात १६ प्रकारचे कर असतात. यात स्थिर आकार, वीज, शुल्क, अंधन समायोजन आकार, वीज विक्री कर व सरासरी देयकाची रक्कम, व्याज इतर आकार, समायोजित रक्कम, व्याजाची थकबाकी, देयकाची निव्वळ रक्कम, पूर्णांक देयक, सुरक्षा ठेव जमा आदींचा समावेश आहे. हे कर निव्वळ ग्राहकांची दिशाभूल करणारे आहेत.
बिलात दर्शविलेले वितरण हे सामान्य ग्राहकांना समजण्यापलिकडचे असते. यामुळे ग्राहकांना समजणारे साधे व सरळ देयक का देण्यात येत नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. ग्राहकांच्या वीज देयकात समायोजित रकमेच्या रकाण्यात लावलेली रक्कम ही ग्राहकाची आर्थिक फसवणूक आहे. वीज वितरण कंपनीला जे आर्थिक नुकसान वा तूट होते, ती देखील ग्राहकांकडून वसूल केली जाते. महावितरणातील गैरप्रकार, विजेची चोरी, तूट यामुळे आर्थिक नुकसान होत असेल तर ती ग्राहकांकडून वसूल करण्याचे प्रयोजन काय, हा महत्वाचा प्रश्न आहे.
दरमहा वीज देयकात अंतिम तारीख असते. त्या तारखेपूर्वी देयक अदा केल्यास १०-२० रूपये सुट व अंतिम तारखेपर्यंत रक्कम न भरल्यास १०- २० रूपयांचा दंड सोसावा लागतो. यातील सुट दिलेली रक्कम पुढील देयकात वळती करीत थकबाकी सूचनेत केवळ ३.७० पैसे वा २.१६ पैसे तत्पर सूट दर्शविली जाते.
हा प्रकार निव्वळ दिशाभूल करून लूट करणारा आहे. विजेची देयके नेहमीच उशीरा व अंतिम तारखेच्यानंतर दिली जातात. यामुळे ग्राहकांना नाहक भुर्दंड सासावा लागतो. निर्माता कंपनी असो वा वितरण कंपनी, वरिष्ठ अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य बजावल्यास नुकसान होत नाही. वीज कंपनीचे अधिकारीच गैरप्रकार करीत असल्याने कंपनी तोट्यात येत असल्याचे सर्वश्रुत आहे. ही नुकसान भराई त्यांच्याकडून वसूल करणे सोडून ग्राहकांची पिळवणूक केली जाते. वीज कंपनीच्या अधिकाऱ्यांनी हा प्रकार रोखण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्राहकांतून होत आहे. कंपनीच्या कारभारामुळे अनेक ग्राहक त्रस्त आहेत. (शहर प्रतिनिधी)