एटापल्लीला वादळाचा तडाखा
By Admin | Updated: May 7, 2016 00:12 IST2016-05-07T00:12:46+5:302016-05-07T00:12:46+5:30
गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात सायंकाळी व रात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळामुळे अनेक घरांचे कवेलु फुटले आहेत.

एटापल्लीला वादळाचा तडाखा
टिनपत्रे उडाले, कवेलू फुटले : २२ घरांची पडझड; लाखो रूपयांचे नुकसान
एटापल्ली : गेल्या पाच दिवसांपासून तालुक्यात सायंकाळी व रात्रीच्या सुमारास झालेल्या जोरदार वादळामुळे अनेक घरांचे कवेलु फुटले आहेत. तसेच काही घरांचे टिनपत्रे उडाले आहे. जनावरांच्या गोठ्यावरील छतही कोसळले. बुधवारी रात्री कसनसूर परिसरात आलेल्या वादळामुळे कसनसूर, जारावंडी या मुख्य मार्गावर मोठे झाड पडल्याने सदर मार्ग बंद झाला आहे. वादळाचा एटापल्ली तालुक्याच्या ग्रामीण भागाला जोरदार तडाखा बसल्याने नागरिकांचे लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे.
५ मे रोजी गुरूवारला रात्री आलेल्या वादळामुळे एटापल्ली शहरातील आनंद नगर येथील राजू कोलुरवार यांचे आटाचक्की व किराणा दुकानाच्या इमारतीवरील छत उडाले. तसेच याच वार्डातील प्रमोद देवतळे यांच्या घरावरील छत उडाले. एटापल्ली-आलापल्ली या मुख्य मार्गावर असलेल्या पुरूषोत्तम गादेवार यांच्या राईसमील गोदाम इमारतीवरील छत उडाले. वादळामुळे एटापल्ली तालुक्यातील नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. जारावंडी मंडळ अधिकारी कार्यालयांतर्गत वडसा खुर्द गावातील पाच घरे, दिंडवी येथील सात व जारावंडी येथे दहा घरांचे छत उडाले. एकूण २२ घरांचे नुकसान झाल्याची तक्रार तहसील कार्यालयाला प्राप्त झाली असल्याची माहिती तहसीलदार संपत खलाटे यांनी दिली. (तालुका प्रतिनिधी)
वादळात झाड कोसळल्याने दोन बैल जखमी
चामोर्शी : तालुक्यातील दोटकुली येथे गुरूवारी रात्री झालेल्या जोरदार वादळामुळे झाड कोसळून शेतकरी रवींद्र चुधरी यांचे दोन बैल जखमी झाल्याची घटना घडली. शेतकरी रवींद्र चुधरी यांनी आपल्या राहत्या घरालगत असलेल्या गुरांच्या गोट्यात आपले गुरे, ढोरे व बैल चारापाणी करून बांधून ठेवले होते. दरम्यान झालेल्या अवकाळी वादळी पावसामुळे घराशेजारचे झाड कोसळल्याने दोन्ही बैल जखमी झाले. या बैलाची किमत ५० हजार रूपये आहे. घराचेही नुकसान झाले. त्यामुळे शासनाने तत्काळ मदत द्यावी, अशी मागणी पं.स. सदस्य प्रमोद भगत यांनी केली आहे. नुकसानीची पाहणी करताना पं.स. सदस्य प्रमोद भगत, दोटकुलीचे सरपंच बोदलकर, उपसरपंच जानकीराम धोबो, कवडू पुटकमवार, बंडू चुधरी, सतीश पुटकमवार उपस्थित होते.