प्रचारतोफा थंडावल्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2017 00:36 IST2017-02-20T00:36:54+5:302017-02-20T00:36:54+5:30
जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे.

प्रचारतोफा थंडावल्या
पोलिंग पार्ट्या रवाना : दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक
गडचिरोली : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीचे दुसऱ्या टप्प्यातील मतदान २१ फेब्रुवारी रोजी होणार आहे. निवडणूक विभागाने प्रचार करण्याची मुदत रविवारी रात्री १२ वाजेपर्यंतच दिली असल्याने सोमवारपासून या भागातील प्रचारतोफा थंडावल्या असून पोलिंग पार्ट्या रवाना होण्यास सुरूवात झाली आहे.
एटापल्ली, भामरागड, सिरोंचा, अहेरी या चार तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीची निवडणूक दुसऱ्या टप्प्यात होत आहे. १६ जिल्हा परिषद क्षेत्र व ३२ पंचायत समिती गणांसाठी निवडणूक घेतली जात आहे. एटापल्ली तालुक्यातील कर्मचाऱ्यांना रविवारी सकाळी ५.३० वाजताच तालुका मुख्यालयात बोलाविण्यात आले. त्यामुळे कर्मचारी शनिवारीच एटापल्ली येथे मुक्कामाने होते. दिवसभरात हेलिकॉप्टरने जवळपास १० चकरा मारून जारावंडी, कसनसूर भागातील पोलिंग पार्ट्यांना पोहोचवून दिले.
एटापल्ली तालुक्यातील ७१ पैकी एक मतदान केंद्र संवेदनशील तर ७० मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहे. भामरागड तालुक्यातील एकूण ३१ मतदान केंद्रांपैकी तीन मतदान केंद्र संवेदनशील, २१ मतदान केंद्र अतिसंवेदनशील व सात मतदान केंद्र साधारण आहेत. अहेरी तालुक्यातील एकूण १०७ मतदान केंद्रांपैकी ३६ मतदान केंद्र संवेदनशील, ४६ मतदान केंद्र अतिसंवेदनशील, २५ मतदान केंद्र साधारण श्रेणीत मोडणारी आहेत. सिरोंचा तालुक्यातील ७८ मतदान केंद्रांपैकी ३१ मतदान केंद्र संवेदनशील, ३७ मतदान केंद्र अतिसंवेदनशील तर १० मतदान केंद्र साधारण श्रेणीत मोडणारे आहेत. एकूण २८७ मतदान केंद्रांपैकी ७१ मतदान केंद्र संवेदनशील तर १७४ मतदान केंद्र अतिसंवेदनशील आहेत.
चारही तालुक्यातील बहुतांश मतदान केंद्र संवेदनशील असल्याने पोलिंग पार्ट्या व पोलीस दलाची वाहतूक हेलिकॉप्टरच्या माध्यमातून केली जात आहे. आज बहुतांश पार्ट्या तालुका मुख्यालयातून निघून बेस कॅम्पवर थांबणार आहेत. त्यानंतर सदर पोलिंग पार्ट्या सोमवारी मतदान केंद्राकडे रवाना होणार आहेत. चारही तालुक्यांमध्ये अतिरिक्त पोलीस ताफा बोलविण्यात आला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)
१९३ वाहने निवडणूक कामात
चारही तालुक्यातील मतदान केंद्रांवर मतदान पथके रवाना करण्यासाठी १९३ वाहने लागणार आहेत. याशिवाय अतिरिक्त वाहने भाडेतत्त्वावर घेण्यात आली आहेत. एटापल्ली तालुक्यात ७१ केंद्रांवर २८४ कर्मचारी व १४ क्षेत्रीय अधिकाऱ्यांना नेण्यासाठी २९ जीप, ५ बसगाड्या व ६ शासकीय वाहने वापरली जात आहेत. भामरागड तालुक्यातील ३१ मतदान केंद्रांवर ६ क्षेत्रीय अधिकारी व १२४ कर्मचाऱ्यांना रवाना करण्यासाठी २१ जीप, २ बसगाड्या व ३ शासकीय वाहने वापरली जात आहेत. अहेरी तालुक्यातील १०७ मतदान केंद्रांवर २१ क्षेत्रीय अधिकारी व ४२८ कर्मचाऱ्यांना रवाना करण्यासाठी ४३ जीप, ८ ट्रक, ९ मिनीट्रक, १२ बसगाड्या व २३ शासकीय वाहने ताब्यात घेतली आहेत. अतिदुर्गम नक्षल प्रभावीत सिरोंचा तालुक्यात ७७ मतदान केंद्र ठेवण्यात आली आहेत. १५ क्षेत्रीय अधिकारी व ३०८ कर्मचाऱ्यांना संबंधित बुथवर रवाना करण्यासाठी १९ जीप, १ ट्रक, ५ राज्य परिवहन महामंडळाच्या ५ बसगाड्या व ६ शासकीय वाहने वापरण्यात येत आहेत.