धानावरची निर्यात बंदी उठवा

By Admin | Updated: December 13, 2014 01:54 IST2014-12-13T01:54:57+5:302014-12-13T01:54:57+5:30

जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नानाविध समस्या व प्रश्नासंदर्भात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी ...

Stop the export of Dhan | धानावरची निर्यात बंदी उठवा

धानावरची निर्यात बंदी उठवा

गडचिरोली : जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या नानाविध समस्या व प्रश्नासंदर्भात गडचिरोली-चिमूर लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय खाद्य व अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची दिल्ली येथे भेट घेवून त्यांच्याशी सविस्तर चर्चा केली व धानावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, या प्रमुख मागणीसह इतर मागण्यांचे निवेदन सादर केले.
याप्रसंगी पासवान यांनी सदर मागण्यांवर योग्य तो निर्णय घेऊन शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचे आश्वासन दिले. यावेळी दिल्ली भाजपाचे रोजगार आघाडीचे अध्यक्ष तुषार रावल, रवींद्र भांडेकर, सतिश चिचघरे उपस्थित होते. गडचिरोली जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळाच्यावतीने गडचिरोली व अहेरी या दोन प्रादेशिक कार्यालयांतर्गत पाच उपप्रादेशिक कार्यालयाच्या देखरेखीखाली ५६ विविध सहकारी संस्थांच्यावतीने जिल्ह्यात धान्य खरेदी केंद्रामार्फत शेतकऱ्यांकडून धानाची खरेदी केल्या जाते.
मात्र सदर धान्याची साठवणूक करण्यासाठी जिल्ह्यात पाहिजे त्या प्रमाणात गोदामाचे बांधकाम झालेले नसल्याने महामंडळाला धान्य बाहेर उघड्यावरच ठेवावे लागतात. या धान्याची उचल वेळेवर होत नसल्याने कोट्यवधी रूपयांच्या धानाची पावसामुळे नासाडी होते. जिल्ह्याच्या या मूलभूत प्रश्नावर तोडगा काढून धानाची उचल वेळीस होण्यासाठी खासदार अशोक नेते यांनी दिल्ली येथे केंद्रीय खाद्य व अन्न पुरवठा मंत्री रामविलास पासवान यांची भेट घेऊन धान्यावरील निर्यात बंदी उठवून धानाची त्वरित उचल करण्यासंदर्भात सविस्तर चर्चा केली. तसेच गडचिरोली जिल्ह्यासह महाराष्ट्रातील अन्य जिल्ह्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना उत्पादनाच्या तुलनेत योग्य हमीभाव देऊन जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्याची विनंती केली व सदर माण्यांचे निवेदन केंद्रीय मंत्र्यांना सादर केले.
सद्यस्थितीत धानावर निर्यात बंदी असल्याने कोट्यवधीचे धान्य पावसाने सडतात. या बाबींची दखल घेऊन धान्यावरील निर्यात बंदी उठविण्यात यावी, उत्पादन खर्चाच्या तुलनेत धानाची हमीभाव ठरवून धान उत्पादक शेतकऱ्यांना प्रतिक्विंटल २०० रूपये बोनस जाहीर करण्यात यावा, यावर्षी अत्यल्प व अवेळी पाऊस झाल्याने धानपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले, त्यामुळे शेतकऱ्यांच्या नुकसानीचे सर्वेक्षण करून त्यांना नुकसानीच्या प्रमाणात नुकसान भरपाई म्हणून आर्थिक मदत देण्यात यावी, तसेच जिल्ह्यातील धान खरेदी केंद्र त्वरित सुरू करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन खासदार अशोक नेते यांनी केंद्रीय मंत्र्यांना सादर केले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: Stop the export of Dhan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.