नोटांच्या तुटवड्याने एटीएम बंदच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 11, 2017 00:55 IST2017-04-11T00:55:07+5:302017-04-11T00:55:07+5:30

रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून गडचिरोली जिल्ह्यातील बँकांना पुरेशा प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध करून देण्यात न आल्याने ....

Stop the ATM shutdown | नोटांच्या तुटवड्याने एटीएम बंदच

नोटांच्या तुटवड्याने एटीएम बंदच

गडचिरोली शहरातही बिकट स्थिती : महिना उलटूनही दुर्गम तालुक्यांमध्ये सेवा ठप्प
गडचिरोली : रिझर्व्ह बँक आॅफ इंडियाकडून गडचिरोली जिल्ह्यातील बँकांना पुरेशा प्रमाणात चलनी नोटा उपलब्ध करून देण्यात न आल्याने दुर्गम भागासह गडचिरोली शहरातीलही एटीएम बंद पडून आहेत. त्यामुळे वेळेवर पैसे काढणाऱ्या ग्राहकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे.
८ नोव्हेंबर २०१६ ला केंद्र सरकारने एक हजार व ५०० ची नोट चलनातून बाद केली. त्यानंतर ५० दिवस नव्या चलनी नोटा मिळविण्यासाठी नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. त्यानंतर परिस्थिती पूर्वपदावर आल्यानंतर आता मार्च महिन्यापासून पुन्हा चलनी नोटांचा तुटवडा जाणवू लागला आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकांसह सहकारी बँकांचे एटीएम बंद पडून आहेत. एटापल्ली या दुर्गम तालुका मुख्यालयाच्या ठिकाणचे स्टेट बँक आॅफ इंडिया व गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम मागील एक महिन्यापासून बंद आहे. अहेरी येथील बँक आॅफ महाराष्ट्रचे एटीएम दोन दिवसांपासून बंद आहे. गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम सुरू आहे.
चामोर्शी येथील बँक महाराष्ट्र व बँक आॅफ इंडियाचेही एटीएमही बंद स्थितीत आहे. आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथील बँक आॅफ इंडियाचे एटीएम दीड महिन्यापासून बंद आहे. वैरागड शाखेशी २५ ते ३० गावांचे ग्राहक जुळलेले असून आरमोरीनंतर वैरागड हे महत्त्वाचे केंद्र आहे. परंतु एटीएम बंद असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नोटबंदीच्या निर्णयानंतर सलग एक महिना हे एटीएम बंद होते. आता पुन्हा मागील दीड महिन्यांपासून एटीएम बंद पडून आहे. येथील शाखा व्यवस्थापकांना विचारणा केली असता, एटीएमबाबत वरिष्ठांना कळविण्यात आले. मात्र त्यांच्याकडून कोणतीही उपाययोजना करण्यात आली नाही, अशी माहिती त्यांनी दिली.
देसाईगंज येथे पाच एटीएम असून सध्या राष्ट्रीयकृत बँकांचे चार एटीएम सुरू आहे. मात्र गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम बंद आहे. मुलचेरा तालुक्यात लगाम येथे एटीएम केंद्राचे काम सुरू आहे. तर मुलचेरा येथे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक व बँक आॅफ महाराष्ट्राच्या एटीएममध्ये रोकड नसल्याने सोमवारी हे एटीएम बंद होते.
गडचिरोली शहरात सर्वच राष्ट्रीयकृत बँका व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकांचे एटीएम आहेत. मात्र बँक आॅफ इंडियाचे चामोर्शी व चंद्रपूर मार्गावरील दोन एटीएम रोकड अभावी बंद असल्याचे सोमवारी दिसून आले. रोकड प्राप्त करण्यासाठी आलेले ग्राहक एटीएमच्या परिसरातून परत जाताना दिसून आले. शहरातील महाराष्ट्र बँक व विजया बँकेचे तसेच स्टेट बँक व जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएम सोमवारी सुरू होते. गेल्या चार-पाच दिवसांपासून शहर व कॉम्प्लेक्स परिसरातील अनेक एटीएममध्ये रोकडचा अभाव दिसून येत आहे. कुरखेडा येथे बँक आॅफ इंडिया व भारतीय स्टेट बँकेचे एटीएम बंद पडून आहे.
आष्टी येथील स्टेट बँकेचे एटीएम सकाळी दोन तास व सायंकाळी ७ वाजता उघडते. कॅश संपली तर एटीएम बंद अशी स्थिती आहे. सोमवारी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे एटीएममध्ये मुख्यालयातून रक्कम कमी आल्याने कॅश संपेपर्यंतच सुरू राहते. सोमवारी एटीएम बंदच होते. तसेच मार्र्कंडा येथे जिल्हा सहकारी बँकेचे एटीएम नव्याने सुरू करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
आरमोरी शहरात सोमवारी सायंकाळी पाचही एटीएम केंद्र बंद असल्याचे दिसून आले. आरमोरी शहरात राष्ट्रीयकृत बँकेचे तीन व जिल्हा सहकारी बँकेचे दोन असे एकूण पाच एटीएम आहे. या पाच एटीएम पैकी बँक आॅफ इंडियाचे एटीएम नोटबंदीपासून चार ते पाचच वेळा उघडले आहे. एटीएम केंद्र बंद असल्याने बँक आॅफ इंडियाच्या ग्राहकांची मोठी पंचाईत होत आहे. आरमोरी शहरास स्टेट बँकेचे एटीएम सुरू होते. मात्र ५ वाजता बंद आढळले. याशिवाय जिल्हा सहकारी बँक व महाराष्ट्र बँकेचे एटीएम बंदच होते. कोरची येथे एटीएम बंद आहे. रविवारी सुरू झाले होते. त्यानंतर सायंकाळी पैसे संपले. सोमवारी पूर्णपणे बंद होते. जिल्ह्यातील इतर तालुक्यातीलही अवस्था अशीच असून कधीकधी नागरिकांना पैसे एटीएममधून मिळतात मात्र बहुतांश वेळा एटीएम बंदच राहत आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Stop the ATM shutdown

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.