जिल्हाभरातील सट्टाबाजार हादरला
By Admin | Updated: April 11, 2015 01:20 IST2015-04-11T01:20:47+5:302015-04-11T01:20:47+5:30
१० एप्रिलच्या लोकमतमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अवैध सट्टा व्यवसायाबाबत स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित

जिल्हाभरातील सट्टाबाजार हादरला
दुकाने झाले बंद : एजंट झाले गायब; देसाईगंज, कुरखेडा, अहेरीत मोठी खळबळ
गडचिरोली : १० एप्रिलच्या लोकमतमध्ये गडचिरोली जिल्ह्यातील अवैध सट्टा व्यवसायाबाबत स्टिंग आॅपरेशनचे वृत्त प्रकाशित झाल्यानंतर जिल्ह्यातील बहुतांशी सट्टाबाजार शुक्रवारी बंद राहिले.
देसाईगंज शहरातील तिन्ही सट्टाकेंद्र दिवसभर बंद होते. पोलिसांनी या सट्टा केंद्रांवर कडक नजर ठेवली होती. कुरखेडा शहरातही लोकमतमध्ये छायाचित्र प्रकाशित झालेले सट्टा केंद्र दिवसभर बंद होते. वैरागड व परिसरातील संपूर्ण सट्टाबाजार शुक्रवारी बंदच राहिला. दरम्यान दारू पकडण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाचे पथक शुक्रवारी कुरखेडा भागात दौऱ्यावर असल्याने त्यांनी दारूसोबतच सट्टा बाजार चालविणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उगारल्याची माहिती आहे. अहेरीतही तीन ते चार परवानाप्राप्त आॅनलाईन सट्टा केंद्र सूचना देऊन बंद केले. तुमच्या जवळचे कागदपत्र आणून दाखविल्याशिवाय सट्ट्याचे दुकान उघडायचे नाही, अशी सूचना अहेरी पोलिसांनी या व्यावसायिकांना केली असल्याची माहिती आहे. दरम्यान लोकमतमध्ये वृत्त झळकल्यावर अहेरीतील सट्टा व्यावसायिकांनी लोकमत प्रतिनिधीला आमचा व्यवसाय परवानाप्राप्त आहे. तुम्ही बातमी दिली कशी? अशी विचारणा केली. मात्र सट्ट्यामुळे अहेरीसह जिल्हाभर अनेकांचे संसार उद्ध्वस्त होत असल्याने अनेक सामाजिक कार्यकर्ते, शिक्षक, प्राध्यापक व वकील मंडळींनी लोकमतने केलेल्या या स्टिंग आॅपरेशनचे कौतुक केले आहे.
‘लोकमत’ने एका सामाजिक जीवनाशी निगडीत असलेल्या प्रश्नाला हात घातला, याबद्दल अनेकांनी लोकमतचे जाहीर कौतुक केले. शुक्रवारी दिवसभर कौतुकाच्या दूरध्वनीचा वर्षात लोकमत प्रतिनिधींवर होत होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)