वडधा बँकेच्या शाखेत चोरी
By Admin | Updated: February 19, 2015 01:38 IST2015-02-19T01:38:14+5:302015-02-19T01:38:14+5:30
आरमोरी तालुक्यातील वडधा येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली.

वडधा बँकेच्या शाखेत चोरी
आरमोरी : आरमोरी तालुक्यातील वडधा येथील गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत १८ फेब्रुवारीच्या मध्यरात्री चोरी झाल्याची घटना घडली. बँकेतून ३ लाख ६२ हजार रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी आरमोरी पोलीस अधिक तपास करीत आहे.
आरमोरी तालुक्यातील वडधा येथे गडचिरोली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने नवीन इमारत बांधली आहे. आठ-पंधरा दिवसांपूर्वीच या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले व येथून आता कामकाज सुरू करण्यात आले होते. नवीन इमारतीच्या खिडकीच्या ग्रिल तोडून अज्ञात चोरट्यांनी बँकेत प्रवेश केला व बँकेच्या लॉकरमध्ये असलेले ३ लाख ६२ हजार रूपयांचा ऐवज लूटुन नेला. आज नेहमीप्रमाणे सकाळी ६.४५ वाजता बँकेची शाखा उघडण्यासाठी कर्मचारी अविनाश मांडवे हे गेले असता, त्यांना बँकेत चोरी झाल्याचे निदर्शनास आले व इमारतीच्या खिडकीची ग्रिलही लाकडी मोठ्या काठीने तोडून चोरट्यांनी बँकेत प्रवेश केल्याचे दिसून आले. रोखपालाच्या कॅबिनमध्ये चोरट्यांनी घुसून ड्रावरही तोडले व बाजुला असलेल्या आलमारीची तोडफोड केली. परंतु त्यात काहीही आढळून आले नाही. लॉकरमधील ३ लाख ६३ हजार रूपये चोरट्यांनी लांबविले. रोखपालाच्या कॅबिनमधील ड्रावरमधून लॉकरच्या चाव्या नेऊन लॉकर उघडण्यात आले हे विशेष. या घटनेची माहिती सकाळी ११ वाजता पोलिसांना देण्यात आली. त्यानंतर उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. राहुल खाडे, ठाणेदार महेंद्र मोरे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. त्यानंतर पोलिसांनी श्वानपथकही घटनास्थळी पाचारण केले. या परिसरातील तब्बल ५ तास पोलीस यंत्रणेचा तपास सुरू होता. (प्रतिनिधी)
सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा अभाव
वडधा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या इमारतीत नुकतेच शाखेचे काम सुरू झाले होते. या ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले नव्हते. त्यामुळे चोरीच्या घटनेची माहिती घेतांना पोलिसांना आता प्रचंड मेहनत करावी लागणार आहे. घटनेनंतर लगेच बुधवारी सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची कारवाई करण्यात आली.