राज्य सरकारचे काम; श्रेयासाठी धडपड

By Admin | Updated: October 5, 2014 23:06 IST2014-10-05T23:06:31+5:302014-10-05T23:06:31+5:30

गेल्या १५ वर्षात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या विकास कामांचे श्रेय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यासाठी काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावले आहेत.

State government work; Clash for Shreya | राज्य सरकारचे काम; श्रेयासाठी धडपड

राज्य सरकारचे काम; श्रेयासाठी धडपड

गडचिरोली : गेल्या १५ वर्षात राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या सरकारने केलेल्या विकास कामांचे श्रेय निवडणुकीच्या तोंडावर घेण्यासाठी काँग्र्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सरसावले आहेत. आमच्या मंत्र्यांमुळेच ही कामे झाली, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस करीत असला तरी काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनीच गडचिरोलीसारख्या दुर्गम व अतिदुर्गम भागाच्या विकासाला चालना दिली. विदर्भ विकास कार्यक्रम हा मुख्यमंत्र्यांचाच होता, असा दावा काँग्रेस आता प्रचारात करू लागली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात काँग्रेसचे दोन व एक अपक्ष आमदार आहेत. काँग्रेसचे दोन आमदार आरमोरी व गडचिरोली क्षेत्रात विकासासाठी धडपडत होते व त्यांनीच विकासाची कामे खेचून आणली. त्यामुळे जिल्ह्याला मोठ्या प्रमाणावर निधी मिळाला, असे काँग्रेसचे म्हणणे आहे. गडचिरोली जिल्ह्यात गोंडवाना विद्यापीठ, गडचिरोली येथे १०० खाटांचे महिला व बाल रूग्णालय, प्रत्येक तालुक्यात शासकीय कार्यालयांना स्वतंत्र इमारत, चामोर्शी तालुक्यात चिचडोह बॅरेज सिंचन प्रकल्प हे सारे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या नेतृत्वात पूर्ण करण्यात आले. आरमोरी विधानसभा क्षेत्रात कोसरी व येंगलखेडा हे दोन मोठे सिंचन प्रकल्पही मार्गी लागलेत, असा दावा काँग्रेसचा आहे. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आर. आर. पाटील पालकमंत्री असल्याने त्यांनीच हे सारे केले, असे सांगत आहेत. पाटील यांच्या प्रयत्नामुळे दोन राज्यांना जोडणारा गोदावरी नदीवरचा पूल सिरोंचा तालुक्यात निर्माणाधीन आहे, असा राष्ट्रवादीचा दावा आहे. तर हा केंद्रात असलेल्या डॉ. मनमोहन सिंग सरकारने मंजूर केलेला आहे, असा काँग्रेसचा दावा आहे. आर. आर. पाटील यांच्या कार्यकाळात केवळ अधिकाऱ्यांचेच राज्य होते. त्यांचेच ऐकून आर. आर. पाटील जिल्हा विकासाचे काम करीत होते, असेही आता काँग्रेसचे नेते जाहीररित्या बोलू लागले आहे. जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमुळे भ्रष्टाचार मोठ्या प्रमाणावर बोकाळला. जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीची सत्ता होती. विकासाचे एक तरी ठोस काम सांगा, असा थेट सवाल काँग्रेसचे नेते आता करू लागले आहे.
काँग्रेस पक्षाकडेच विकासाचे व्हिजन आहे. आजवर गडचिरोली जिल्ह्याच्या विकासासाठी काँग्रेसनेच प्रामाणिक प्रयत्न केले आहे. हे जनता विसरणार नाही, असाही प्रचार आता जोर धरत आहे. १० टक्के कमिशन विकास कामावर घेण्याची आमची संस्कृती नाही, असा टोला काँग्रेस नेत्यांनी विरोधकांसह १५ वर्ष आपला सहकारी राहिलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसलाही लगावला आहे. गडचिरोली जिल्ह्यात कृषी महाविद्यालय आणण्याचे काम गडचिरोलीच्या विद्यमान आमदारांनीच केले, असेही काँग्रेस सांगू लागली आहे. एकूणच राज्य सरकारच्या गेल्या १५ वर्षातील सर्व कामावर काँग्रेस आपला दावा सांगत आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही या कामाचे श्रेय घेत आहे. धर्मरावबाबा आत्राम मंत्री असतांनापासून या सर्व कामांचा पाठपुरावा करण्यात आला, अशी मल्लीनाथी राकाँ करीत आहे. मात्र गडचिरोली शहरासह जिल्ह्यातील जनतेला विकासाचे खरे कर्तबगार लोक पुरूष कोण आहेत, याची जाण आहे. त्यामुळे जनता या साऱ्या दाव्यांकडे केवळ मनोरंजनाच्या दृष्टीने पाहत असून कोणते लोकप्रतिनिधी व पक्ष खऱ्या अर्थाने विकासभिमूख होते, याचीही जाण मतदारांना आहे.
अहेरी विधानसभा क्षेत्रात अपक्ष उमेदवार असलेल्या विद्यमान आमदारांनी आपल्या मतदार संघात झालेले सर्व काम आपल्यामुळेच झाले. आपण सरकारकडे पाठपुरावा केला. त्यामुळे अनेक गावात वीज आली. पाणी पोहोचले, असा दावा केला आहे. एकूणच दावे, प्रतिदावे रंगत आहेत. मतदार राजा सर्वांचा एकूण काय तो निर्णय घेईल, त्याचा निर्णय १९ आॅक्टोबरला कळेल. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: State government work; Clash for Shreya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.