मॉडेल स्कूलचा खर्च राज्य सरकार उचलणार
By Admin | Updated: July 2, 2015 02:03 IST2015-07-02T02:03:54+5:302015-07-02T02:03:54+5:30
जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या मॉडेल स्कूलसाठी केंद्र शासनाकडून ७० टक्के व राज्य शासनाकडून ३० टक्के निधी दरवर्षी प्राप्त होत होता.

मॉडेल स्कूलचा खर्च राज्य सरकार उचलणार
गडचिरोली : जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सुरू करण्यात आलेल्या मॉडेल स्कूलसाठी केंद्र शासनाकडून ७० टक्के व राज्य शासनाकडून ३० टक्के निधी दरवर्षी प्राप्त होत होता. मात्र यंदा २०१५-१६ सत्रापासून केंद्र शासनाने मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे मॉडेल स्कूलच्या खर्चासाठी केंद्र शासनाकडून निधी मिळणार नाही. मात्र आता शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याशी झालेल्या चर्चेनुसार गडचिरोली जिल्ह्यातील पाचही मॉडेल स्कूलचा संपूर्ण खर्चाचा वाटा राज्य सरकार उचलणार आहे, अशी माहिती गडचिरोलीचे पालकमंत्री तथा राज्याचे आदिवासी विकास राज्यमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
जिल्ह्यातील पाच मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय केंद्र शासनाने घेतला होता. त्यानंतर या मॉडेल स्कूलमधील विद्यार्थ्यांचे लगतच्या शाळेत समायोजन करण्याची कार्यवाही सुरू झाली होती. दरम्यान मॉडेल कॉलेज बंद करू नये, या मागणीला घेऊन पाचही तालुक्यात पालक व विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले. याची दखल घेत आपण राज्याचे शालेय शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. मॉडेल स्कूल बंद करण्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यात वातावरण तापले आहे. त्यामुळे सदर मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू ठेवावे, अशी मागणी त्यांच्याकडे केली. गडचिरोली जिल्ह्यातील मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू ठेवण्यासाठी शिक्षणमंत्री तावडे यांनी मान्यता दिली आहे. त्यानुसार २ जुलै गुरूवारपासून पाचही ठिकाणचे मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू होणार आहे, असे ना. आत्राम यांनी सांगितले.
केंद्र शासनाने महाराष्ट्र राज्याच्या सर्व जिल्ह्यात मॉडेल स्कूल सुरू केले होते. मात्र गडचिरोली वगळून इतर जिल्ह्यात मॉडेल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांकडून प्रवेशाकरिता अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. तसेच फलश्रृती दिसून येत नव्हती. त्यामुळे केंद्र व राज्य शासनाने महाराष्ट्रातील सर्व मॉडेल स्कूल बंद करण्याचा निर्णय घेतला. गडचिरोली जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या मॉडेल स्कूलमुळे धानोरा, भामरागड, एटापल्ली, सिरोंचा, अहेरी आदी पाच तालुक्याच्या दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमातून शिक्षण घेण्याची संधी प्राप्त झाली. या पाचही तालुक्यात इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाची दुसरी कुठलीही सोय नाही. त्यामुळे सदर मॉडेल स्कूल सुरू ठेवणे आवश्यक असल्याचा आग्रह आपण शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्याकडे धरला. याशिवाय मॉडेल स्कूलच्या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र ते विदेशात असल्याने त्यांची भेट होऊ शकली नाही. त्यामुळे आपण शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी चर्चा करून जिल्ह्यातील मॉडेल स्कूलचा प्रश्न मार्गी लावला, असेही पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी सांगितले. (स्थानिक प्रतिनिधी)
नव्या प्रवेशप्रक्रियेबाबत संभ्रम
जिल्ह्यातील पाचही मॉडेल स्कूलमधील जुन्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाकरिता सदर मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे. जुन्या प्रवेशित विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय यंदाच्या सत्रापासून होणार आहे. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, याकरिता आपण शिक्षणमंत्री तावडे यांच्याशी चर्चा केली. त्यानुसार पाचही मॉडेल स्कूल पुन्हा सुरू होणार आहेत, असे पालकमंत्री आत्राम म्हणाले. मात्र यंदा २०१५-१६ च्या सत्रात सदर मॉडेल स्कूलमध्ये नव्या विद्यार्थ्यांना प्रवेश देणार काय, असा प्रश्न पत्रकारांनी पालकमंत्र्यांना विचारला. यावर उत्तर देताना पालकमंत्री आत्राम म्हणाले, नव्या प्रवेश प्रक्रियेबाबत शासनस्तरावर वाटाघाटी सुरू आहेत. मात्र मॉडेल स्कूलमध्ये शिकत असलेल्या जुन्या विद्यार्थ्यांच्या इंग्रजी माध्यमाच्या शिक्षणाच्या सुविधेकरिता सदर पाचही मॉडेल स्कूल पूर्ववत सुरू करण्यात येणार आहे , असेही ते यावेळी म्हणाले.
मॉडेल स्कूलच्या प्रश्नावर राजकारण करण्याचा प्रयत्न
मॉडेल स्कूलमधील विद्यार्थी तसेच पालक आपल्याला भेटून चर्चा केली असती तर आपण तेव्हाच सदर प्रश्न मार्गी लावला असता, परिणामी विद्यार्थ्यांवर आंदोलन करण्याची वेळ आली नसती. दरम्यान मॉडेल स्कूल बंद झाल्याच्या प्रश्नावर काही राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांकडून राजकारण करण्याचा प्रयत्न झाला, असा आरोप पालकमंत्री आत्राम यांनी यावेळी केला. विद्यार्थ्यांच्या शिक्षणाच्या प्रश्नांबाबत आपण संवेदनशील आहो, असेही ते यावेळी म्हणाले.