लोह प्रकल्पाने बदलणार जिल्ह्याची दशा

By Admin | Updated: May 12, 2017 02:33 IST2017-05-12T02:33:53+5:302017-05-12T02:33:53+5:30

चार राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेला आणि ८० टक्के जंगलाने व्यापलेला एकमेव जिल्हा म्हणून

The state of the district will be replaced by the iron ore project | लोह प्रकल्पाने बदलणार जिल्ह्याची दशा

लोह प्रकल्पाने बदलणार जिल्ह्याची दशा

अनेक वर्षांची प्रतीक्षा संपणार : औद्योगिक विकासाच्या दृष्टीने पडणार जिल्ह्याचे पहिले पाऊल
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चार राज्यांच्या सीमावर्ती भागात असलेला आणि ८० टक्के जंगलाने व्यापलेला एकमेव जिल्हा म्हणून गडचिरोली जिल्ह्याची ओळख आहे. आदिवासीबहुल, दुर्गम क्षेत्र आणि नक्षलवादाने पोखरलेल्या या जिल्ह्यात आतापर्यंत कोट्यवधी रुपये खर्च झाले तरी विकासाच्या वाटेवर या जिल्ह्याचे नाव आले नाही. मात्र आता प्रस्तावित लोह निर्मिती प्रकल्पासोबत जिल्हा मुख्यालय रेल्वेमार्गाने जोडण्याची कामे सुरू होत असल्यामुळे या जिल्ह्याची दशा आणि दिशा बदलण्यास खऱ्या अर्थाने सुरूवात होणार आहे.
सदर लोह प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यात होणार किंवा नाही, याबाबत गेल्या अनेक दिवसांपासून संभ्रमाची स्थिती होती. पण आता त्यावर शिक्कामोर्तब झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शुक्रवारी (दि.१२) चामोर्शी तालुक्यातील आष्टीजवळच्या कोनसरी या गावात या प्रकल्पाच्या कोनशिलेचे अनावरण करणार असल्याची माहिती गुरूवारी खासदार अशोक नेते व आ.डॉ.देवराव होळी यांनी पत्रपरिषदेत दिली. यावेळी माजी जि.प.अध्यक्ष रविंद्र ओलालवार, भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबुराव कोहळे, जिल्हा सचिव डॉ.भारत खटी, पं.स.उपसभापती विलास दशमुखे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
यावेळी खा.नेते यांनी सांगितले, जिल्ह्यात दळणवळणाची साधने नसल्यामुळे आतापर्यंत हा जिल्हा औद्योगिक विकासापासून वंचित राहिला. पण गडचिरोलीला रेल्वेमार्गाने जोडण्यापासून तर जिल्ह्यात चार राष्ट्रीय महामार्ग निर्मितीच्या मंजुरीपर्यंत सतत पाठपुरावा केला, दोन वेळा सभागृहात अशासकीय ठराव आणला. एवढेच नाही तर आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्याची फलश्रुती होऊन आता रेल्वेमार्गासह राष्ट्रीय महामार्गाने जिल्ह्याला जोडले जाणार आहे. त्यामुळे जिल्ह्यात विपुल प्रमाणात असलेल्या खनिज संपत्तीच्या उत्खननातून आणि त्यावर आधारित प्रकल्पांमधून जिल्ह्याची स्थिती बदलेल, अशा विश्वास खा.नेते यांनी व्यक्त केला.
लॉयड मेटल्स अ‍ॅन्ड एनर्जी या कंपनीच्या पुढाकाराने उभारल्या जात असलेला कोनसरी येथील प्रकल्प ५७ हेक्टर जमिनीवर राहणार असून त्यासाठी ३७ शेतकऱ्यांची जमीन अधिग्रहित केली जाणार आहे. त्या शेतकऱ्यांना भूमी अधिग्रहण कायद्यानुसार बाजारभावापेक्षा चौपट मोबदला दिला जाणार आहे. काही शेतकऱ्यांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शुक्रवारीच चेक वाटपही होणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या लोह प्रकल्पामुळे २ हजारापेक्षा जास्त लोकांना प्रत्यक्ष तर २ ते ३ हजार लोकांना अप्रत्यक्ष रोजगाराची संधी उपलब्ध होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील बेरोजगारीचा प्रश्न काही अंशी दूर होईल. जिल्ह्यात इतरही खनिज संपत्ती मुबलक प्रमाणात असल्यामुळे भविष्यात इतर प्रकल्प उभे होतील, असा विश्वास यावेळी खा.नेते व आ.डॉ.कोळी यांनी व्यक्त केला.

म्हणून टाटांनी केला होता ‘टाटा’
जिल्ह्यातील लोहखनिजाचे उत्खनन करून प्रकल्प उभारणीसाठी १९२७ मध्ये ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी जिल्ह्याच्या सुरजागड भागात जाऊन पाहणी केली होती. परंतू दळवळणाची साधने नसल्यामुळे येथे प्रकल्प उभारणे परवडणारे नसल्यामुळे टाटांनी येथे लोह प्रकल्प उभारण्याचा मानस सोडून दिला, अशी माहिती खा.नेते यांनी दिली.

‘टॅक्स हॉलिडे’ पॅकेज द्या
गडचिरोली जिल्ह्यावर पंतप्रधानांसह मुख्यमंत्र्यांची विशेष नजर आहे. त्यामुळे या जिल्ह्यात उद्योग वाढीला चालना देण्यासाठी जम्मू काश्मिर आणि उत्तरांचलच्या धरतीवर ‘टॅक्स हॉलिडे’ पॅकेज द्यावे अशी मागणी केंद्र सरकारकडे केली असल्याचे यावेळी खा.नेते यांनी सांगितले. हे पॅकेज मिळाल्यास या जिल्ह्यात उद्योग उभारणी करणाऱ्यांना कोणताही कर द्यावा लागणार नाही. त्यामुळे मोठ्या प्रमाणात येथे उद्योग येतील.

भूमिपूजनासह मुख्यमंत्री घेणार आढावा बैठक
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मार्च महिन्यातील दौऱ्यानंतर दोन महिन्यात दुसऱ्यांदा गडचिरोलीच्या दौऱ्यावर येत आहेत. मुख्यमंत्री सुरूवातीला जिल्हाधिकारी कार्यालयात विविध विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत आढावा बैठक घेतील. त्यानंतर लॉयड मेटल्सच्या कोनसरी येथील लोह निर्मिती प्रकल्पाच्या कामाचे भूमिपूजन करतील. त्यानंतर हेलिकॉप्टरने नागपूरकडे रवाना होतील.

Web Title: The state of the district will be replaced by the iron ore project

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.