एटीएममधून आलेली खराब नोट घेण्यास स्टेट बँकेचा नकार
By Admin | Updated: March 19, 2015 01:25 IST2015-03-19T01:25:11+5:302015-03-19T01:25:11+5:30
येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून काढण्यात आलेल्या ५०० रूपयाच्या नोटेवर काळा डाग असल्याने ती घेण्यास बँक अधिकाऱ्याने नकार दिला व आपल्याला उद्धट वागणूक दिली,.....

एटीएममधून आलेली खराब नोट घेण्यास स्टेट बँकेचा नकार
चामोर्शी : येथील स्टेट बँकेच्या एटीएममधून काढण्यात आलेल्या ५०० रूपयाच्या नोटेवर काळा डाग असल्याने ती घेण्यास बँक अधिकाऱ्याने नकार दिला व आपल्याला उद्धट वागणूक दिली, असा आरोप रणजीत नारायण सातपुते यांनी पत्रकार परिषदेत केला आहे.
येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखेतून रणजीत नारायण सातपुते यांनी १७ मार्च २०१५ ला सकाळी ११.३३ वाजता १० हजार रूपये व ११.३४ वाजता ५ हजार रूपये असे एकूण १५ हजार रूपये काढले. यातील १४ हजार ५०० रूपये दुसऱ्याच्या खात्यावर टाकण्यासाठी रोखपालाकडे दिले असता, त्यातील ५०० रूपयाची एक नोट चालत नाही म्हणून त्यांनी परत केली. ६ डब्ल्यू ९८३१३७ या क्रमांकाच्या नोटेच्या मध्यभागी काळा डाग आहे, म्हणून ती परत करण्यात आली. त्यानंतर बँक व्यवस्थापकाकडे जाऊन या नोटेसंबंधीची माहिती त्यांना दिली. त्याला आम्ही जबाबदार नाही, तुम्हाला जे करायचे असेल ते करा, असे म्हणून त्यांनी हाकलून लावले, असा आरोपही सातपुते यांनी केला आहे. फाटक्या व जुन्या नोटा बदलवून देण्याची तरतूद असतानाही त्याच बँकेच्या एटीएममधून काढलेली फाटकी नोट बदलवून न देणाऱ्या कर्मचारी व व्यवस्थापकावर कारवाई करण्यात यावी, अशी सातपुते यांची मागणी आहे.
यासंदर्भात चामोर्शी येथील स्टेट बँक आॅफ इंडियाच्या शाखा व्यवस्थापक एस. जी. माटे यांना विचारणा केली असता, आपल्याकडे लेखी तक्रार नसल्याने याप्रकरणी काहीही बोलता येणार नाही, असे त्यांनी सांगितले. (तालुका प्रतिनिधी)