अड्याळ, कन्हाळगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 4, 2021 04:16 IST2021-05-04T04:16:30+5:302021-05-04T04:16:30+5:30
चामोर्शी तालुका परिसरातील येनापूर हे मोठे गाव म्हणून ओळखले जात असून आरोग्याची समस्या लक्षात घेऊन येथे गेल्या ...

अड्याळ, कन्हाळगाव येथे कोविड केअर सेंटर सुरू करा
चामोर्शी तालुका परिसरातील येनापूर हे मोठे गाव म्हणून ओळखले जात असून आरोग्याची समस्या लक्षात घेऊन येथे गेल्या काही वर्षांपासून आरोग्य पथक कार्यरत आहे. मात्र या आरोग्य पथकात गेल्या तीन वर्षांपासून वैद्यकीय अधिकारी नसल्याने हे पथक एनआरएचएमच्या भरवशावर आरोग्य सेवा पुरवीत आहे. मात्र गेल्या एक वर्षापासून कोरोना महामारीचे प्रमाण वाढल्याने नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने अनेक समस्या वाढल्या आहेत. येनापूर परिसरात जैरामपूर, मुधोली तुकूम, मुधोली रिठ, मुधोली चक न.२, लक्ष्मणपूर, विट्ठलपूर, गणपूर रै., सेलुर, दुर्गापूर, किष्टापूर, अड्याळ, चित्तरंजनपूर, सगणापूर, आंबोली, वायगाव, चांदेस्वर, रवींद्रपूर, राजगोपालपूर, कन्हाळगाव, प्रियदर्शनी, रश्मीपूर, सोमनपल्ली, धर्मपूर, हळदी, हळदीमाल असे २o ते २५ गावे समाविष्ट आहेत. या गावांचे केंद्रबिंदू असलेल्या येनापूर आरोग्य पथकात वैघकीय अधिकारीच नसल्याने नागरिकांच्या आरोग्याचे उपचार कसे होत असतील, याची कल्पना न केलेली बरी. कोरोना व्हायरसने चांगलाच कहर केला असून पहिली लाट संपताच यावर्षी दुसरी लाट तीव्र गतीने सुरू झाल्यामुळे रुग्णसंख्येतही झपाट्याने वाढ होत आहे.
दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागालाही चांगलेच ग्रासले आहे. येनापूर आरोग्य पथकांतर्गत येणाऱ्या गावांत दिवसेंदिवस रुग्णसंख्येचा आकडा वाढत आहे. रुग्णाचा इतरांशी संसर्ग होऊ नये म्हणून अशा रुग्णांना कोविड केअर सेंटरमध्ये दाखल करून त्यांच्यावर उपचार करण्यासाठी स्थानिक आरोग्य पथकात कोविड सेंटर नसल्यामुळे तालुका व जिल्हा ठिकाणावर हलवावे लागत आहे. रुग्णांच्या गंभीर परिस्थितीचा विचार करून अड्याळ व कन्हाळगाव येथील आश्रमशाळेत कोविड केअर सेंटर सुरू करण्यात यावे, अशी मागणी सरपंच निखाडे यांनी केली आहे.