सुरजागडपासून पदयात्रेला प्रारंभ
By Admin | Updated: December 14, 2015 01:33 IST2015-12-14T01:33:45+5:302015-12-14T01:33:45+5:30
लोहप्रकल्प एटापल्लीतच उभारण्यात यावा, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने सुरजागड ते गडचिरोली दरम्यान पदयात्रा काढण्यात आली ...

सुरजागडपासून पदयात्रेला प्रारंभ
गावात घेतल्या सभा : गडचिरोलीत पोहोचणार आंदोलक
एटापल्ली : लोहप्रकल्प एटापल्लीतच उभारण्यात यावा, या मुख्य मागणीसह इतर मागण्यांसाठी जनहितवादी युवा समितीच्या वतीने सुरजागड ते गडचिरोली दरम्यान पदयात्रा काढण्यात आली असून या पदयात्रेचा सुरजागड येथून रविवारी शुभारंभ करण्यात आला.
आदिवासींचे दैवत सुरजागड येथील ठाकूर देवस्थानात ठाकूर देवाची पूजा करून यात्रेला प्रारंभ झाला. यात्रेचे नेतृत्व जनहितवादी युवा समितीचे संयोजक सुरेश बारसागडे यांनी केले. पदयात्रेदरम्यान सुरजागड, गटेपल्ली, जांबडा, एकदा, बटेर, एटापल्ली या गावांमधील शेकडो युवक, युवती व नागरिक सहभागी झाले होते. हातात काळा झेंडा, कपाळावर काळी पट्टी बांधून पदयात्रेत युवक सहभागी झाले. सुरजागड ते एटापल्ली दरम्यान पडलेल्या सर्व गावांमध्ये सभा घेऊन यात्रेचा मुख्य उद्देश समजावून सांगण्यात आला व या यात्रेत सहभागी होण्याचे आवाहन सुरेश बारसागडे यांनी केले. या यात्रेचे मंगेर, हेडरी, परसलगोंदी, आलदंडी, तुमरगुंडा व एटापल्ली येथे स्वागत झाले. नक्षलदृष्ट्या अतिसंवेदनशील भागातूनही पोलीस संरक्षणाविना पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेत संघटनेच्या सहसचिव सरिता पुंगाटी, राकेश पुंगाटी, राहूल धोंगडे यांच्यासह शेकडो नागरिक सहभागी झाले. (तालुका प्रतिनिधी)