जि.प.मध्ये मुलाखत प्रक्रिया सुरू
By Admin | Updated: February 9, 2017 01:33 IST2017-02-09T01:33:37+5:302017-02-09T01:33:37+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागात शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत.

जि.प.मध्ये मुलाखत प्रक्रिया सुरू
कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती : जिल्हाभरातील कर्मचाऱ्यांची गर्दी
गडचिरोली : गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत विविध विभागात शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्याची कार्यवाही जि. प. प्रशासनाच्या वतीने हाती घेण्यात आली आहे. दरम्यान जिल्हा परिषदेत पुनर्नियुक्तीसाठी मुलाखत देण्याकरिता जिल्हाभरातील कंत्राटी कर्मचारी गर्दी करीत आहेत. ६ फेब्रुवारी सोमवारपासून जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची पुनर्नियुक्ती मुलाखत प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
१६ व २१ फेब्रुवारी रोजी जिल्ह्याच्या बाराही तालुक्यात दोन टप्प्यात जिल्हा परिषद क्षेत्र व पंचायत समिती गणासाठी निवडणूक होणार आहे. जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात निवडणुकीच्या प्रचाराचा माहोल तापला आहे. तर दुसरीकडे जिल्हा परिषद प्रशासनाने कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीची प्रक्रिया हाती घेतल्याने जिल्हा परिषदेत कंत्राटी कर्मचाऱ्यांची गर्दी होत आहे.
गडचिरोली जिल्हा परिषदेअंतर्गत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, स्वच्छ भारत मिशन, जिल्हा आरोग्य विभाग, शिक्षण विभाग (प्राथमिक व माध्यमिक), पंचायत विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा आदींमध्ये कंत्राटी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. हे सर्व विभाग मिळून जिल्हा परिषद व तालुका मुख्यालयाच्या कार्यालयात शेकडोंच्या संख्येने कंत्राटी कर्मचारी कार्यरत आहेत. जि. प. अंतर्गत कार्यरत कंत्राटी कर्मचाऱ्यांना त्यांचा कंत्राटी कालावधी संपल्यानंतर एक दिवसाचा खंड देऊन पुनर्नियुक्तीचे आदेश दिले जातात. मात्र जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनू गोयल यांनी कंत्राटी कर्मचाऱ्यांचा कामाचे दैनंदिन मूल्यमापन घेणे काही महिन्यापूर्वीपासून सुरू केले आहे. आता पुनर्नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली असून या प्रक्रियेदरम्यान संबंधित कंत्राटी कर्मचाऱ्यांनी मागील कंत्राटी कालावधीत केलेले काम समाधानकारक होते किंवा नाही, याची चाचपणी केली जात आहे. या संदर्भात विभाग प्रमुखांनी वस्तूनिष्ठ अहवाल तयार करून वर्गवारीप्रमाणे संबंधित कर्मचाऱ्यांना रॅकिंग द्यावी, ज्या कंत्राटी कर्मचाऱ्या सहा महिन्यात सी वर्गवारी मिळाली, त्यांना त्यांच्या कामात सुधारणा करण्यासाठी सक्त ताकीद देण्यात यावी, अशा प्रकारचे आदेश जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतून गोयल यांनी सर्व विभागप्रमुखांना पत्रांन्वये दिले होते. आता या सर्व बाबींचा विचार मुलाखत प्रक्रियेत करण्यात येत असून समाधानकारक काम करणाऱ्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना पुनर्नियुक्ती देण्याचा निर्णय जि. प. प्रशासनाने घेतला आहे.
निवडणूक आचारसंहितेच्या काळात कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्ती मुलाखत प्रक्रियेबाबत जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी शांतून गोयल यांना कार्यालयाच्या दूरध्वनीवरून विचारणा केली असता, त्यांचा भ्रमणध्वनी बंद दाखवत होता. त्यामुळे यात त्यांची प्रतिक्रिया जाणून घेता आली नाही. (स्थानिक प्रतिनिधी)
अशी आहे सेवा पुनर्विलोकन समिती
जि. प. अंतर्गत विविध विभागातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या पुनर्नियुक्तीसाठी पुनर्विलोकन समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीमध्ये जि. प. मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचा प्रामुख्याने समावेश आहे. याशिवाय सदस्य म्हणून उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सामान्य), मुख्य लेखा तथा वित्त अधिकारी, प्रकल्प संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, उपमुख्य कार्यकारी अभियंता (पाणी व स्वच्छता), जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकारी, शिक्षणाधिकारी (माध्यमिक, प्राथमिक), उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत), कार्यकारी अभियंता (पाणीपुरवठा) यांचा समावेश आहे.
जिल्हा परिषदेच्या विविध विभागात कर्मचाऱ्यांची अनेक पदे रिक्त असल्याने कंत्राटी कर्मचाऱ्यांवर प्रशासकीय कामाचा भार आहे. या कर्मचाऱ्यांकडून गतीने काम करून घेण्यासाठी जि. प. प्रशासन दक्ष आहे.