गट्टेपल्लीत बांबू कापणीला प्रारंभ
By Admin | Updated: June 3, 2015 01:55 IST2015-06-03T01:55:02+5:302015-06-03T01:55:02+5:30
भारतीय वन अधिनियम व राज्यपालांच्या पेसा कायदाच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीमुळे पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना बांबू या वनोपजाच्या कापणी ..

गट्टेपल्लीत बांबू कापणीला प्रारंभ
एटापल्ली : भारतीय वन अधिनियम व राज्यपालांच्या पेसा कायदाच्या अधिसूचनेच्या अंमलबजावणीमुळे पेसा क्षेत्रातील ग्रामसभांना बांबू या वनोपजाच्या कापणी व विक्री व्यवस्थापनाबाबतचे अधिकार प्रदान करण्यात आले आहे. त्यामुळे एटापल्ली तालुक्यातील अतिदुर्गम गट्टेपल्ली ग्रामसभेने आपल्या हद्दीतील जंगलात बांबू कापणीच्या कामाला प्रारंभ केला आहे. यातून ग्रामसभा आर्थिकदृष्ट्या सक्षम होणार आहे.
३१ मार्च २०१५ च्या शासन निर्णयात बांबू कापणी व विक्री व्यवस्थापनाबाबतच्या मार्गदर्शक तत्त्वे नमूद करण्यात आले आहे. एटापल्ली तालुक्यातील बांबूची कापणी करणाऱ्या गट्टेपल्ली हे गाव पहिलेच ठरले आहे.
ग्रामसभेच्या माध्यमातून गट्टेपल्ली लगतच्या जंगलामध्ये बांबू तोडीच्या कामाला एप्रिल महिन्यात सुरूवात झाली होती. मात्र तेंदू हंगामामुळे काही दिवस बांबूच्या कापणीचे काम थांबले होते. आता तेंदू हंगाम आटोपल्यामुळे २ जून मंगळवारपासून गट्टेपल्ली ग्रामसभेने पुन्हा बांबूच्या कापणीला जोमात सुरूवात केली आहे. बांबू कापणी व विक्री व्यवस्थापनाचे व्यवहार करण्यासाठी ग्रामसभेने बँकेत खाते उघडले आहे.
ग्रामसभेला वनोपजाच्या कापणी, विक्री व्यवस्थापनाबाबच्या शासनाच्या निर्णयाला नक्षलवाद्यांनी सुध्दा समर्थन दर्शविले असल्याचे बोलल्या जात आहे. (तालुका प्रतिनिधी)
जनहितवादी युवा समितीच्या लढ्याला यश
राष्ट्रीय जनहितवादी युवा समितीचे अध्यक्ष सुरेश बारसागडे यांनी समितीच्या इतर पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन पेसा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी ग्रामसभेला बळकट करण्याच्या मागणीसाठी अनेकदा आंदोलने उभारलीत. शासन व प्रशासन स्तरावर पाठपुरावा केला. याशिवाय पेसा हद्दीतील गावातील नागरिकांना पेसा कायदा अधिकाराबाबत जागरूक केले. त्यामुळेच गट्टेपल्लीसारख्या गावाने बांबू कापणीचे काम सुरू केले.