बांबू तोड प्रक्रिया तत्काळ सुरू करा
By Admin | Updated: March 12, 2015 02:08 IST2015-03-12T02:08:02+5:302015-03-12T02:08:02+5:30
वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्

बांबू तोड प्रक्रिया तत्काळ सुरू करा
अहेरी : वन विभागाकडून बांबू उपलब्ध होत नसल्याने पेपर मिल कंपनीकडून कामगार कपात व उद्योग बंद होण्याची शक्यता आहे. परिणामी शेकडो कुटुंबावर बेकारीची कुऱ्हाड कोसळणार आहे. त्यामुळे हजारो नागरिकांना रोजगार उपलब्ध होण्यासाठी वन विभागाने तत्काळ बांबू तोड प्रक्रिया सुरू करावी, अशी मागणी पेपर मील कामगार, मजूर व अहेरी तालुका काँग्रेसच्या वतीने राज्याचे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे करण्यात आली आहे.
यासंदर्भात भामरागडचे उपवनसंरक्षक संजय हलमारे यांच्या मार्फत वनमंत्री मुनगंटीवार यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, चंद्रपूर जिल्ह्यातील बल्लारपूर शहरात पेपर मिल उद्योग आहे. तसेच गडचिरोली जिल्ह्यातील आष्टी येथेही बिल्ट कंपनीचा कागद कारखाना आहे. या दोनही पेपर मिलमध्ये नियमित, कंत्राटी व रोजंदारी तत्त्वावर १५ हजार पेक्षा अधिक कामगार काम करीत आहेत. पेपर मिल उद्योगामुळे इतर शेकडो नागरिकांनादेखील मोठ्या प्रमाणात रोजगार उपलब्ध होत आहे. मात्र वन विभागाकडून बांबू तोड प्रक्रिया बंद असल्यामुळे या पेपर मिलला बांबू मिळणे कठिण झाले आहे. त्यामुळे कागद उद्योग बंद होण्याची भीती निर्माण झाली आहे, विहीत कालावधीत बांबू न तोडल्यास बांबू निकामी होतो, असेही निवेदनात म्हटले आहे. निवेदन देताना कामगार युनियनेच सदस्य सुरेश उराडे, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेबुब अली, युका विधानसभा क्षेत्राचे अध्यक्ष बालाजी गावडे, एम. एम. देशमुख, एम. के. गुडधे, एस. एस. मोटे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)