पूर्ण तयार शौचालयांना लावले स्टिकर
By Admin | Updated: September 7, 2016 02:08 IST2016-09-07T02:08:19+5:302016-09-07T02:08:19+5:30
गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता एटापल्ली पंचायत समितीला अचानक भेट दिली.

पूर्ण तयार शौचालयांना लावले स्टिकर
सीईओंची एटापल्लीला भेट : तोडसात आरोग्य केंद्र व शाळेची केली पाहणी
एटापल्ली : गडचिरोली जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनू गोयल यांनी मंगळवारी दुपारी १२ वाजता एटापल्ली पंचायत समितीला अचानक भेट दिली. त्यानंतर ते कसनसूर येथे गेले. तेथे प्राथमिक आरोग्य केंद्र व जिल्हा परिषद शाळेला भेट देऊन परत येताना तोडसा प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामपंचायत कार्यालयाला भेट दिली.
तोडसा येथे स्वच्छ भारत मिशन योजनेंतर्गत सुरू असलेल्या शौचालय बांधकामाची पाहणी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी केली. तीन शौचालयांची पाहणी करून पूर्ण बांधकाम झालेल्या शौचालयांवर हिरवे स्टिकर लावण्यात आले. शौचालय बांधकाम करणाऱ्यांना त्यांनी प्रोत्साहन देऊन एटापल्ली येथे पंचायत समिती कार्यालयात संवर्ग विकास अधिकारी अशोक इल्लुरकर यांच्यासह अधिकाऱ्यांशी विविध विकास कामांवर चर्चा केली व त्यांच्याकडून माहिती जाणून घेतली.
त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शंतनू गोयल यांनी तालुक्यात महिला बचत गटाचे कार्य उल्लेखनिय सुरू असून त्यांना प्रोत्साहन देऊन मदत केली जाणार आहे. तालुक्यात आठ ग्रामपंचायती हागणदारीमुक्त गाव म्हणून घोषीत करण्यात आल्या असून या ग्रामपंचायती अंतर्गत गावात शौचालय बांधकाम सुरू करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. स्वच्छ भारत मिशन, १४ वा वित्त आयोग, आमचा गाव-आमचा विकास या योजनेंतर्गत तालुक्यात विकासकामे होणार असून आपण वारंवार भेटी देऊन या सर्व विकासकामांचा आढावा घेणार आहो, असे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले. तसेच एटापल्ली तालुक्यात रस्ता दुरूस्तीच्या कामाकडेही लक्ष दिले जाईल, अशी माहिती त्यांनी दिली.
सलगच्या शाासकीय सुट्यानंतर पहिल्याच दिवशी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी भेट दिल्याने कर्मचारी धास्तावलेल्या स्थितीत दिसले. रूजू झाल्यानंतर सीईओंचा हा पहिलाच एटापल्ली दौरा होता. एकूणच या अचानक झालेल्या दौऱ्यामुळे प्रशासकीय यंत्रणेचीही चांगलीच तारांबळ उडाली. (तालुका प्रतिनिधी)