बंधनकारक फेऱ्यांमुळे एसटी अडचणीत

By Admin | Updated: December 4, 2014 23:07 IST2014-12-04T23:07:43+5:302014-12-04T23:07:43+5:30

एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा

ST Trouble due to Obligatory Rounds | बंधनकारक फेऱ्यांमुळे एसटी अडचणीत

बंधनकारक फेऱ्यांमुळे एसटी अडचणीत

गडचिरोली आगार : प्रति किलोमीटर २३ रूपये व प्रतिदिवस अडीच लाखांचा तोटा
गडचिरोली : एसटीला येणारा खर्च भरून निघत नसतानाही जनतेच्या सेवेसाठी गडचिरोली आगाराच्यावतीने सुमारे २१९ बसफेऱ्या चालविल्या जात असून या बसफेऱ्यांमुळ प्रती किलोमीटर एसटीला २३ रूपयांचा तर दर दिवशी अडीच लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. हीच परिस्थिती राज्याच्या इतर आगारांमध्ये असल्याचे दिसून येते.
गाव तिथे एसटी ही बिद्रवाक्य घेऊन राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस ग्रामीण तसेच दुर्गम भागातील प्रवाशांची वाहतूक करतात. त्यामुळेच एसटीला राज्याची लोकवाहिणी म्हणून ओळखल्या जाते. नफ्यापेक्षाही लोकसेवेचा विचार पुढे करून रस्तयांवरील खाचखडगे पार करीत एसटी धावत असल्याने एसटी विषयी नागरिकांच्या मनात एक आपुलकीची भावना निर्माण झाली आहे. या सर्व कसरती करीत असताना एसटीला स्वत:ला मात्र तोट्याचा सामना करावा लागत आहे.
गडचिरोली एसटी आगारसुध्दा यापासून अपवाद नाही. गडचिरोली आगारात एकूण ११० बसेस आहेत. या संपूर्ण बसेसच्या दिवसाच्या एकूण ५७६ बसफेऱ्या होतात. या बसफेऱ्यांमधून गडचिरोली आगाराला दिवसाकाटी ८.५ ते ९ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त होते. मात्र एसटीचा प्रत्यक्ष खर्च मात्र यापेक्षाही जास्त असल्याने महिन्याच्या शेवटी हिशेब काढल्यानंतर एसटीला तोटा झाल्याचे लक्षात येते.
एकूण बसफेऱ्यांपैकी सुमारे २१९ बसफेऱ्या बंधनकारक आहेत. यामध्ये १३७ बसफेऱ्या मानवविकास मिशनच्या बसगाड्यांच्या तर एसटीच्या स्वत:च्या बसेसच्या ८२ बसफेऱ्यांचा समावेश आहे. बंधनकारक बसफेऱ्यांमध्ये अपवाद वगळता नेहमीच तोटा सहन करावा लागतो. मात्र जनतेची सेवा करण्याच्या उद्देशाने या बसफेऱ्या चालविल्या जातात. या मार्गावर धावणाऱ्या बसेस बऱ्याचवेळा प्रवाशी घेऊन गेल्या तर आगारात येतेवेळी रिकाम्या येतात. आगारात येतेवेळी प्रवाशी घेऊन आल्या तर जातेवेळी रिकाम्या जातात.
एसटीचा प्रतीकिमीचा खर्च सरासरी ३५ रूपये आहे. मात्र या मार्गावर बऱ्याचवेळा एसटी बिनाप्रवाशी धावत असल्याने सरासरी १२ रूपये प्रती किमी उत्पन्न प्राप्त होते. परिणामी एसटीला प्रती किमीमागे २३ रूपयांचे नुकसान सहन करावे लागते. गडचिरोली आगारातील मानव विकास मिशनच्या बसेस दर दिवशी ६ हजार किमी तर इतर बसेस ४ हजार ५०० किमी बंधनकारक मार्गांवर धावतात. एसटीचा पूर्ण खर्च भरून निघण्यासाठी ३५ रूपये किमीप्रमाणे या बसफेऱ्यांमधून दरदिवशी ३ लाख ६७ हजार ५०० रूपयांचे उत्पन्न प्राप्त होणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात मात्र १ लाख २६ हजार रूपयांचेच उत्पन्न प्राप्त होते. त्यामुळे दरदिवशी २ लाख ४१ हजार रूपयांचा तोटा एसटीला सहन करावा लागतो.
बंधनकारक बसफेऱ्यांमुळे होणारा तोटा लक्षात घेऊन एसटीने व्यवहारीकतेचे धोरण अवलंबण्यास सुरूवात केली तर या सर्व बसफेऱ्या बंद कराव्या लागतील. मात्र या बंद झाल्यास ग्रामीण भागातील नागरिक व विद्यार्थ्यांची फार मोठी अडचण निर्माण होईल. त्यामुळे लोकप्रतिनिधींचा दबाव वाढतो. एसटी महामंडळ हे राज्य सरकारच्या अखत्यारित असलेले महामंडळ आहे. त्यामुळे व्यवहारिकता व लोकसेवा या दोघांचाही ताळमेळ एसटीला जोडावा लागतो. हे सर्व करीत असताना एसटी मात्र नेहमीच तोट्याचा सामना करीत आलेली आहे.
(नगर प्रतिनिधी)

Web Title: ST Trouble due to Obligatory Rounds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.