एसटीने विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर

By Admin | Updated: September 11, 2015 01:46 IST2015-09-11T01:46:58+5:302015-09-11T01:46:58+5:30

आरमोरी तालुक्यातील मांगदा, अंगारासाख्या दुर्गम भागातून मानव विकास मिशनच्या बसने जवळपास ५० शाळकरी मुले-मुली शिक्षणासाठी आरमोरी येथे दररोज प्रवास करतात.

ST left the students | एसटीने विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर

एसटीने विद्यार्थ्यांना सोडले वाऱ्यावर

आरमोरीतील प्रकार : ठाणेदारांनी सुखरूप पोहोचविले गावी
चुरमुरा : आरमोरी तालुक्यातील मांगदा, अंगारासाख्या दुर्गम भागातून मानव विकास मिशनच्या बसने जवळपास ५० शाळकरी मुले-मुली शिक्षणासाठी आरमोरी येथे दररोज प्रवास करतात. शाळेची सुटी झाल्यानंतर नेहमीप्रमाणे बुधवारला ३५ विद्यार्थी आरमोरीच्या बसस्थानकावर आले. मात्र मानव विकास मिशनची बसच आली नाही. अखेर अंधार पडल्यावर रात्री ९ वाजताच्या सुमारास आरमोरीचे ठाणेदार ढवळे यांनी पुढाकार घेऊन सर्वच ३५ विद्यार्थ्यांना दोन वाहनाने त्यांच्या गावी सुखरूप पोहोचविले.
आरमोरी-वैरागड-अंगारा मार्गे मालेवाडा अशी बसफेरी मानव विकास मिशनच्या माध्यमातून परिवहन महामंडळाने विद्यार्थ्यांसाठी सुरू केली. मात्र बसच्या अनियमिततेचा फटका विद्यार्थ्यांना नेहमीच बसत असतो. वैरागड, मोहझरी, मांगदा, अंगारा व परिसरातील विद्यार्थी आरमोरी येथे शाळा, महाविद्यालय व कॉन्व्हेंटमध्ये शिक्षणासाठी दररोज ये-जा करतात. विद्यार्थ्यांच्या ये-जा करण्याची वेळ निश्चित करून महामंडळातर्फे बस सुरू करण्यात आली. नेहमीप्रमाणे बुधवारी विद्यार्थी याच बसने शिक्षणासाठी सकाळी आरमोरीला आले. सायंकाळी शाळेची सुटी झाल्यानंतर सर्वच विद्यार्थी आरमोरीच्या जुन्या बसस्थानकावर बसची प्रतीक्षा करीत होते. परंतु सायंकाळी ५.३० पासून रात्री ९ वाजेपर्यंत बस आली नाही. त्यामुळे सर्वच विद्यार्थी भयभित झाले.
सदर बाब आरमोरी येथील विनोद निकुरे व काही युवकांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी गडचिरोली आगारात दूरध्वनी केला. परंतु आगार प्रशासनाकडू समाधानकारक उत्तर मिळाले नाही. या युवकांनी सदर बाब पत्रकारांच्या लक्षात आणून दिली. त्यानंतर पत्रकारांनी आरमोरीचे ठाणेदार सुभाष ढवळे यांच्या निदर्शनास ही गंभीर बाब आणून दिली. त्यानंतर लगेच ठाणेदार ढवळे यांनी पोलीस ठाण्यातील वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांना बसस्थानकावर पाठवून माहिती घेतली. दोन पर्यायी वाहनांची व्यवस्था करून रात्री ९ वाजता सर्व मुलांना त्यांच्या गावी सुखरूप सोडून देण्यात आले.
विद्यार्थ्यांना वाऱ्यावर सोडणाऱ्या चालक, वाहकावर कारवाई करण्याची मागणी पालकांनी केली आहे. (वार्ताहर)

Web Title: ST left the students

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.