एसटी चालक-वाहक कामबंद आंदोलन करणार

By Admin | Updated: February 11, 2017 01:47 IST2017-02-11T01:47:06+5:302017-02-11T01:47:06+5:30

ठाणे जिल्ह्यातील भिवंडी एसटी आगारात बस वळविताना रिक्षाला एसटीचा धक्का लागल्याने रिक्षा चालकांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली.

The ST driver-carrier will do the agitated movement | एसटी चालक-वाहक कामबंद आंदोलन करणार

एसटी चालक-वाहक कामबंद आंदोलन करणार

प्रशासनाला इशारा : बसचालकाच्या हत्येचा निषेध
गडचिरोली : ठाणे जिल्ह्यातील भिवंडी एसटी आगारात बस वळविताना रिक्षाला एसटीचा धक्का लागल्याने रिक्षा चालकांनी एसटी चालकाला बेदम मारहाण केली. यात एसटी चालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची घटना गरूवारी घडली. या घटनेचा गडचिरोली आगारातील चालक, वाहक व इतर एसटी कामगारांनी तीव्र शब्दात निषेध केला आहे. शनिवारी गडचिरोली येथे कामबंद आंदोलन करण्यात येईल, असा निर्णय कामगारांनी घेतला आहे व या संदर्भात गडचिरोलीचे तहसीलदार व एसटीच्या विभागीय नियंत्रकांना लेखी निवेदन शुक्रवारी दिले.
तहसीलदारांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, भिवंडी येथे रिक्षा चालकाच्या बेदम मारहाणीत प्रभाकर शाहूराज गायकवाड या एसटी बसचालकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. एसटी कामगार संघटना या प्रकरणावर आक्रमक झाली असून राज्यभरात या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला जात आहे. मात्र या गंभीर प्रकरणाची शासन व प्रशासनाने दखल घेतली नाही. बसचालकाच्या मृत्यूस कारणीभूत असलेल्या रिक्षा चालकांवर कोणतीच कारवाई करण्यात आली नाही. यावरून एसटी चालक-वाहकांना शासन व प्रशासनाकडून कुठल्याही स्वरूपाचे संरक्षण नाही, असे सिध्द होते. त्यामुळे या प्रकरणातील दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी निवेदनातून एसटी चालक व वाहकांनी केली आहे. शनिवारी चालक-वाहक कामबंद आंदोलन करतील, असा इशारा निवेदनातून देण्यात आला आहे. नायब तहसीलदार खारकर यांना निवेदन देताना सुनिल खोब्रागडे, शेखर उके, तुळशीराम बांगरे, रत्नपाल चुधरी, संजय बाटबर्वे, सचिन बंडवाल, अशोक विधाते, राजेंद्र पेटकर, गेडाम, मुद्दावार व चालक-वाहक हजर होते.

बसफेऱ्या बंद राहणार
भिवंडी येथील रिक्षा चालकाच्या मारहाणीत बस चालकाच्या मृत्यू झाल्याच्या घटनेच्या निषेधार्थ गडचिरोली आगारातील चालक-वाहक शनिवारी कामबंद आंदोलन करणार आहेत. त्यामुळे गडचिरोली आगारांतर्गत लांब पल्ल्याच्या तसेच इतर बसफेऱ्या बंद राहण्याची शक्यता आहे. बसफेऱ्या बंद राहिल्या तर प्रवाशांची प्रचंड अडचण होणार आहे. गडचिरोली आगारामार्फत सोडण्यात येणाऱ्या बहुतांश बसफेऱ्या बंद ठेवून डेपो बंद आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती सुनिल खोब्रागडे, रत्नपाल चुधरी व इतर चालक - वाहकांनी दिली आहे.

 

Web Title: The ST driver-carrier will do the agitated movement

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.