एसटीचे चाक तोट्यातच!
By Admin | Updated: May 16, 2015 01:52 IST2015-05-16T01:52:49+5:302015-05-16T01:52:49+5:30
गडचिरोली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांसाठी स्वतंत्र स्थापन करण्यात आलेल्या गडचिरोली विभागाला ...

एसटीचे चाक तोट्यातच!
दिगांबर जवादे गडचिरोली
गडचिरोली, अहेरी व ब्रह्मपुरी या तीन आगारांसाठी स्वतंत्र स्थापन करण्यात आलेल्या गडचिरोली विभागाला २०१४-१५ या आर्थिक वर्षात सुमारे १४ कोटी १२ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. मागील वर्षी या विभागाला १९ कोटी ६९ लाख रूपयांचा तोटा झाला होता.
महाराष्ट्राची लोकवाहिनी म्हणून नावलौकीक मिळविलेल्या एसटीचे चाक मागील काही वर्षांपासून तोट्याच्या गर्तेत रूतले आहे. एसटी व शासनाच्या वतीने आजपर्यंत अनेक उपाय करण्यात आले असले तरी एसटीला तोट्यातून बाहेर काढणे आजपर्यंत तरी शक्य झाले नाही. राज्यातील एखादा आगार वगळता प्रत्येक आगाराला तोट्याचा सामना करावा लागला आहे.
गडचिरोली विभागात गडचिरोली, अहेरी व चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी या तीन आगारांचा समावेश आहे. २०१४-१५ या वर्षात गडचिरोली आगाराला प्रवासी वाहतुकीतून ३६ कोटी सात लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. याच वर्षी डिझेल, कर्मचाऱ्यांचे वेतन, वाहनांची देखभाल यासारख्या बाबींवर ४४ कोटी १२ लाख रूपये खर्च झाले आहेत. उत्पन्नापेक्षा खर्च अधिक असल्याने सुमारे ८.५ कोटी रूपयांचा तोटा गडचिरोली आगाराला सहन करावा लागला आहे. मागील वर्षीच्या तुलनेत यावर्षी गडचिरोली आगाराची स्थिती थोडी समाधानकारक आहे. मागील वर्षी सुमारे १२ कोटी १७ लाख रूपयांचा तोटा झाला होता.
अहेरी आगाराला २०१४-१५ या वर्षात २७ कोटी ६१ लाख रूपये उत्पन्न प्राप्त झाले. यावर्षीचा खर्च ३१ कोटी ४१ लाख रूपये आहे. यावर्षी या आगाराला तीन कोटी ८० लाख रूपयांच्या तोट्याचा सामना करावा लागला आहे. २०१३-१४ मध्ये या आगाराला पाच कोटी दोन लाख रूपयांचा तोटा झाला होता. मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी तोट्याचे प्रमाण एक कोटी २२ लाखांनी कमी झाले आहे.
ब्रह्मपुरी आगाराला २३ कोटी २२ लाख रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले. मात्र खर्च २५ कोटी ४९ लाखांचा असल्याने याही आगाराला दोन कोटी २७ लाख रूपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. गडचिरोली विभागातील तिन्ही आगारांना मिळून २०१४-१५ या वर्षात १४ कोटी १२ लाख रूपयांचा तोटा झाला आहे. २०१३-१४ मधील एकूण तोटा १९ कोटी ६९ लाख रूपये एवढा होता. म्हणजेच २०१४-१५ मधील तोटा २०१३-१४ च्या तुलनेत ५.५७ कोटी रूपयांनी कमी आहे. (नगर प्रतिनिधी)
जिल्हाभरात मोठ्या प्रमाणात अवैध वाहतूक केली जाते. अवैध वाहतूक करणारे वाहन एसटीच्या समोर जाऊन प्रवाशांची उचल करतात. या वाहनांच्या मागे रिकामी एसटी धावत असल्याचे चित्र बघावयास मिळते.
रात्रीच्या दरम्यान व दुर्गम भागातील मार्गावर चालणाऱ्या बसचे वाहक तिकीटाची रक्कम स्वत:च्या खिशात टाकत असल्याने एसटीचे उत्पन्न कमी झाले आहे.
बंधनकारक फेऱ्यांनी वाढली चिंता
एसटी महामंडळावर शासनाचे नियंत्रण असल्याने प्रवासी वाहतुकीतून नफा कमविण्याबरोबरच सामाजिक बांधिलकीही जोपासावी लागते. एखाद्या मार्गावर प्रवासी पाहिजे त्या प्रमाणात मिळत नसतानाही लोकप्रतिनिधी किंवा नागरिकांच्या मागणीनंतर त्या मार्गावर बसेस चालवावी लागते. प्रत्येक आगारातील जवळपास २० टक्के फेऱ्या बंधनकारक राहतात. गडचिरोली आगारातील ५०९ फेऱ्यांपैकी ९८ फेऱ्या बंधनकारक आहेत. या फेऱ्यांमधून उत्पन्न मिळत नसल्याने एसटीच्या तोट्यात भर पडत आहे.
महाराष्ट्र शासन १७.५ टक्के एवढा प्रवासी कर आकारते. त्यामुळे एसटीच्या उत्पन्नातील बराचसा भाग शासनाकडे जमा करावा लागतो. २०१४-१५ यावर्षात गडचिरोली विभागाने सुमारे १३ कोटी ७४ लाख रूपयांचा प्रवासी कर शासनाकडे जमा केला आहे. यावर्षाचा तोटा १४ कोटी १२ लाख रूपये एवढा आहे. शासनाने प्रवासी करातून एसटीला सूट दिल्यास एसटीची तोट्यातून मुक्तता होण्यास मदत होईल, अशी आशा एसटीच्या कर्मचारी वर्गाकडून व्यक्त केली जात आहे.