गडचिराेली जिल्ह्यात धानाला फुटले अंकूर; आठवडाभरापासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 23, 2021 20:57 IST2021-11-23T20:57:05+5:302021-11-23T20:57:42+5:30
Gadchiroli News मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात येत असलेल्या पावसामुळे कापून ठेवलेला धाना पाण्यात भिजून अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहेत.

गडचिराेली जिल्ह्यात धानाला फुटले अंकूर; आठवडाभरापासून अवकाळी पावसाचा धुमाकूळ
गडचिराेली : मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात वेगवेगळ्या भागात येत असलेल्या पावसामुळे कापून ठेवलेला धाना पाण्यात भिजून अनेक शेतकऱ्यांच्या धानाला अंकुर फुटले आहेत. हातात आलेले पीक नष्ट हाेताना बघून शेतकरीवर्ग चिंतातूर झाला आहे.
यावर्षीच्या हंगामात जिल्ह्यात अगदी वेळेवर पाऊस पडला. तसेच राेगांचे प्रमाण कमी असल्याने धान पीक अतिशय चांगले हाेते. मात्र, ऐन धान कापणीच्या वेळेवर अवकाळी पावसाने जिल्ह्यात धूमाकूळ घातला आहे. मागील आठ दिवसांपासून जिल्ह्यात अधूनमधून पाऊस काेसळतच आहे. त्यामुळे सखल भागातील बांध्यांमध्ये पाणी साचून आहे. परिणामी धानाचे लाेंब अंकुरले आहेत. काही धान कुजून नष्ट हाेत आहे. हाताशी आलेले पीक वाया जाताना बघून शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला आहे.
दरम्यान, प्रशासकीय यंत्रणेने नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू केले असून लवकरात लवकर नुकसानभरपाई द्यावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांकडून केली जात आहे.