विहीरगावातच भ्रमणध्वनी मनोरा उभारा
By Admin | Updated: September 19, 2016 02:05 IST2016-09-19T02:05:41+5:302016-09-19T02:05:41+5:30
तालुक्यातील विहीरगाव येथे भारत संचार निगम लिमिडेटचा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यासाठी दोन वर्षांपासून विहीरगाववासीय धडपड करीत आहेत.

विहीरगावातच भ्रमणध्वनी मनोरा उभारा
नागरिकांची खासदारांकडे मागणी : मनोरा पळविण्याचा डाव असल्याचा आरोप
आरमोरी : तालुक्यातील विहीरगाव येथे भारत संचार निगम लिमिडेटचा भ्रमणध्वनी मनोरा उभारण्यासाठी दोन वर्षांपासून विहीरगाववासीय धडपड करीत आहेत. असे असतानाही काही नागरिकांनी उपविभागीय अधिकारी व बीएसएनएलच्या अधिकाऱ्यांना चुकीची माहिती देऊन विहीरगावातील भ्रमणध्वनी मनोरा दुसऱ्या ठिकाणी पळविण्याचा डाव आखला. मात्र, सदर बाब गावकऱ्यांच्या लक्षात येताच त्यांनी शनिवारी खा. अशोक नेते यांना निवेदन देऊन भ्रमणध्वनी मनोरा विहीरगावातच निर्माण करण्याची मागणी केली.
आरमोरी, धानोरा या दोन तालुक्याला जोडणाऱ्या मार्गावर मध्यंतरी ठिकाणी विहीरगाव वसले आहे. या गावाच्या सभोवताल ८ ते १० खेडे असून या खेड्यातील गावकऱ्यांना तालुक्यात जाण्यासाठी विहीरगावरून जावे लागते. विहीरगाव येथे भारत संचार निगम लिमिटेडचा मनोरा उभारावा. सतत दोन वर्षांपासून विहीरगाववासीय खा. अशोक नेते व भारत संचार निगम लिमिटेडच्या अधिकाऱ्यांची भेट घेऊन मागणी करीत आहेत. मात्र, विहीरगाव नजिकच्या काही निवडक लोकांनी गुपचूप आरमोरी तहसील कार्यालयात जावून चुकीची माहिती देसाईगंजच्या उपविभागीय अधिकाऱ्यांना दिली. त्यामुळे उपविभागीय अधिकाऱ्यांनी प्रस्तावित भ्रमणध्वनी मनोऱ्यासाठी जागेची पाहणी केली. मात्र त्यांनी विहीरगाव येथील जागा न पाहता नजिकच्या नरोटीमाल येथील जागा पाहिली. सदर बाब लक्षात येताच नागरिकांनी खा. अशोक नेते यांची भेट घेऊन भ्रमणध्वनी मनोऱ्याबाबत चर्चा केली. खा. अशोक नेते यांनी सदर प्रकरणाची चौकशी करून न्याय मिळवून देणार, असे आश्वासन दिले. यावेळी सिर्सी ग्रा. पं. सदस्य तामराव सहारे, रवींद्र सहारे, देवाजी फुकटे, डॉ. सुधाकर वाघाडे, लुमेश रोहणकर, टिकाराम भोयर, अफजल बेग, रामदास गावडे, जनार्धन मंगर, संदीप मडावी, भास्कर देशमुख आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)