डीपीसीचा १०० टक्के निधी योग्य पध्दतीने वेळेत खर्च करा - जिल्हाधिकारी
By Admin | Updated: June 15, 2016 02:02 IST2016-06-15T02:02:44+5:302016-06-15T02:02:44+5:30
जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक पध्दतीने काम करण्याची गरज आहे.

डीपीसीचा १०० टक्के निधी योग्य पध्दतीने वेळेत खर्च करा - जिल्हाधिकारी
गडचिरोली : जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी पुढाकार घेऊन सकारात्मक पध्दतीने काम करण्याची गरज आहे. विभाग प्रमुखांनी जिल्हा नियोजन मंडळाचा १०० टक्के निधी विहित वेळेत योग्य पध्दतीने खर्च करावा असे निर्देश जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांनी दिले.
जिल्हा नियोजन मंडळ निधी खर्चाबाबतची आढावा बैठक मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली. यावेळी ते बोलत होते. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षासाठी गडचिरोली जिल्ह्यास सर्व साधारण गटात १६३ कोटी १४ लक्ष नियतव्यय मंजूर आहे. यापैकी ६ कोटी ८५ लाख ३४ हजार रूपयाची रक्कम यंत्रणांना बीडीएसवर वितरित करण्यात आली आहे. जिल्ह्याचा वार्षिक आदिवासी योजना आराखडा २२ कोटी ७ लक्ष रूपयांचा असून आदिवासी उपयोजना आराखडा ३३ कोटी ४२ लक्ष रूपयांचा आहे. सर्वसाधारण गटाचा वाटप निधी व तरतूद झालेल्या नियतव्ययाचा जिल्हाधिकारी नायक यांनी आढावा घेतला. बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी शंतनु गोयल, उपवनसंरक्षक लक्ष्मी अनबत्तुला, सहायक जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, एस. राममूर्ती आदी उपस्थित होते. (स्थानिक प्रतिनिधी)
मार्कंडासाठी स्वतंत्र निधी
तीर्थक्षेत्र विकास योजनेंतर्गत मार्कंडासाठी निधी प्रस्तावित आहे. यातून यात्री निवास बांधण्याचे नियोजन आहे. पर्यटन विकास योजनेंतर्गत मार्कंडासाठी स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.