प्रॉपर्टी कार्डसाठी जागा मोजमापाला गती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2017 02:10 IST2017-03-10T02:10:20+5:302017-03-10T02:10:20+5:30
ज्या जागेवर बंगाली समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. त्या नागरिकांना त्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे.

प्रॉपर्टी कार्डसाठी जागा मोजमापाला गती
श्यामनगरपासून सुरूवात : बंगाली समाजातील नागरिकांना मिळणार प्रॉपर्टी कार्ड
चामोर्शी : ज्या जागेवर बंगाली समाजाचे नागरिक वास्तव्यास आहेत. त्या नागरिकांना त्या जागेचे प्रॉपर्टी कार्ड देण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. याची अंमलबजावणी सुरू झाली असून मागील १५ दिवसांपासून चामोर्शी तालुक्यात बंगाली समाजाच्या नागरिकांचे जागे मोजमापाला गती मिळाली आहे.
बांग्लादेशाच्या निर्मितीनंतर चामोर्शी, मुलचेरा तालुक्यामध्ये हजारो बंगाली बांधव वास्तव्यास आले. शासकीय जमिनीवर अतिक्रमण करून त्यांनी घर बांधले. मात्र या नागरिकांना अजुनपर्यंत प्रॉपर्टी कार्ड देण्यात आले नव्हते. राज्य शासनाने याबाबतचा निर्णय घेऊन बंगाली समाजाच्या नागरिकांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण करण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या अतिक्रमीत जागेची मापणी शासनाच्या मार्फतीनेच केले जात आहे. मागील १५ दिवसांत या प्रक्रियेला गती मिळाली आहे. चामोर्शी तालुक्यातील श्यामनगर येथे ९ मार्च रोजी मोजमाप करणारे कर्मचारी पोहोचले व त्यांनी कामाचा शुभारंभ केला. यावेळी सरपंच सदल बिश्वासल, पोलीस पाटील सुप्रभात रॉय, तंमुस अध्यक्ष श्यामल मंडल, सपन बिश्वास, सुकल्यान रॉय, केना ढाली, तेजेन बिश्वास, प्रशांत गाईन उपस्थित होते. मोजमापाची प्रक्रिया आटोपल्यानंतर संबंधित अतिक्रमणधारकांना प्रॉपर्टी कार्डचे वितरण केले जाणार आहे. (तालुका प्रतिनिधी)