तालुका मुख्यालयात नगराध्यक्षपदाच्या हालचालींना वेग
By Admin | Updated: November 11, 2015 00:55 IST2015-11-11T00:55:17+5:302015-11-11T00:55:17+5:30
गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगर पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सोमवारी मुंबई येथे या नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडतही जाहीर झाली.

तालुका मुख्यालयात नगराध्यक्षपदाच्या हालचालींना वेग
नऊ ठिकाणी धूम : राजकीय पक्षांकडून मोर्चे बांधणी सुरू
गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात नऊ नगर पंचायतीच्या निवडणुका नुकत्याच पार पडल्या. त्यानंतर सोमवारी मुंबई येथे या नगर पंचायतीच्या नगराध्यक्ष पदाची आरक्षण सोडतही जाहीर झाली. त्यामुळे ऐन दिवाळीच्या तोंडावर आता राजकीय मोर्चेबांधणीला नवही तालुका मुख्यालयात वेग आला आहे. अनेक ठिकाणी भाजप-काँग्रेस व काही ठिकाणी भाजप-राकाँ अशा आघाड्या तयार करून सत्तेची खुर्ची मिळविण्यासाठी घडामोडी सुरू झाल्या आहेत.
दुर्गम व अविकसित तालुका असलेल्या भामरागड येथे भाजपला सर्वाधिक सात जागा मिळाल्या आहेत. अहेरी विधानसभा क्षेत्रात येणाऱ्या भामरागड येथे काँग्रेसला सहा व राकाँला चार जागा आहेत. १७ सदस्यीय नगर पंचायतीत काँग्रेस-राकाँ आघाडी करून सत्ता स्थापन होवू शकते, परंतु निवडणुकीपूर्वी येथे दोन काँग्रेसची आघाडी होणार होती, ती फिसकटली. आता निकालानंतरही दोन काँग्रेस एकत्र यायला तयार नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपसोबत हात मिळविणी करण्याच्या तयारीत आहे. काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी ही खेळी खेळली जात आहे. अडीच वर्ष नगराध्यक्ष पद भाजपला देवून ही हालचाल केली जाऊ शकते. काँग्रेस-भाजप एक होण्यास येथे बरीच अडचण दिसत आहे.
जिल्हास्तरावरील दोनही पक्षांचे पदाधिकारी दोन काँग्रेसची आघाडी व्हावी, या मानसिकतेत असले तरी स्थानिक राकाँ कार्यकर्ते मात्र भाजपसोबत बसण्यासाठी हालचाली करीत आहेत. सिरोंचा येथेही काँग्रेस-राकाँ व आविसं आघाडी करून सत्ता मिळविता येते. मात्र काँग्रेसचे तीन सदस्य भाजपसोबत बसण्यासाठी हालचाली करीत आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस येथे मोठा पक्ष असला तरी त्यांना सत्तेबाहेर ठेवण्यासाठी स्थानिक कार्यकर्त्यांचे प्रयत्न सुरू झाले आहेत. भाजपच्या नेतृत्वात सिरोंचात सत्ता स्थापन करण्यासाठी काँग्रेसच्या १५ वर्ष सत्ता भोगलेल्या नेत्यांचा पुढाकार दिसून येत आहे. त्यामुळे येथे भाजपला नगराध्यक्षपद व काँग्रेसला उपाध्यक्षपद मिळू शकते, अशी शक्यता आहे. एटापल्लीत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांना लक्ष घालावे लागणार आहे. येथे काँग्रेस-राकाँ मिळून सत्ता स्थापन होऊ शकते. त्यादृष्टीने प्रयत्न सुरू झाले असल्याचे सुतोवात आहे.
अहेरीत भाजपची सत्ता स्थापन करण्यासाठी पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांचे जोरकस प्रयत्न सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेससोबत अपक्ष असल्याचे राकाँच्या नेत्यांचा दावा आहे. त्यामुळे जो अधिक थैल्या ढिल्या करेल, त्या बाजुने सत्तेचा तराजू दोलयमान करेल, अशी येथील परिस्थिती आहे. चामोर्शी येथेही काँग्रेस पक्षाला नऊ जागा मिळाल्या आहेत व एक अपक्ष काँग्रेस सोबत आहे. मात्र नगराध्यक्षपदावरून काँग्रेसमध्ये मोठ्या प्रमाणावर खल सुरू आहे. काँग्रेस दोन गटात विभाजीत झाल्याचे चित्र निर्माण केले जात आहे. काँग्रेसचा एक गट शिवसेना व आणखी काही अपक्षांना सोबत घेऊन सत्ता स्थापन करेल, अशाही वावड्या उठविल्या जात आहेत. मात्र चामोर्शी काँग्रेसच्या सर्वच नेत्यांसाठी प्रतिष्ठेचा विषय असल्याने माजी खा. मारोतराव कोवासे, विधानसभेचे उपनेते विजय वडेट्टीवार, जिल्हाध्यक्ष डॉ. नामदेव उसेंडी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती अतुल गण्यारपवार हे नवनिर्वाचित नगर सेवकांना समजावून देऊन येथे संपूर्ण सत्ता काँग्रेसचीच बसविण्यासाठी प्रयत्न करतील, असे सध्यातरी वाटत आहे. पूर्ण बहुमत असताना काँग्रेस फुटली तर याचा चांगला मॅसेज राज्यपातळीवरही जाणार नाही. याची चिंता या नेत्यांनाही आहे. त्यामुळे या ठिकाणी काँग्रेस नेते संपूर्ण नेते खर्च करण्याची शक्यता आहे.
कुरखेडा येथे भाजपला सात जागा मिळाल्या आहेत. भाजप येथे काँग्रेसचे तीन व एक काँग्रेस बंडखोर अपक्ष याची मदत घेऊन सत्ता स्थापन करू शकते, यासाठी भाजपने हालचाली सुरू केल्या असल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष जीवन पाटील नाट यांच्या पुढाकाराने येथे सत्ता समिकरण आकारास येण्याची शक्यता आहे. भाजप-शिवसेनेसोबतही बोलणी करीत असून यातून काय तोडगा निघतो, हे आगामी काळात कळेल. यापूर्वी काँग्रेसने ग्राम पंचायत असताना येथे भाजप विचाराच्या लोकांशी सत्ता संबंध जोडले होते. हा इतिहास आहे.
कोरची येथे नसरू भामानी हे नगराध्यक्षपदासाठी प्रमुख दावेदार आहेत. त्यामुळे शिवसेना-भाजपची निवडणुकीनंतरही युती कायम राहून येथे भगवाच फडकेल, यात काहीही अडचण दिसत नाही. धानोरा येथे ललीत बरछा यांची आघाडी अपक्षांच्या मदतीने सत्तेचे समिकरण सहजपणे जुळविण्याची शक्यता आहे. एकूणच जिल्ह्यातील राजकीय परिस्थिती पाहू जाता, नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत कोणताही पक्ष कशीही युती, आघाडी करू शकतो, अशी स्थिती सध्या तरी दिसत आहे. भाजप वगळता काही राजकीय पक्ष फुटूही शकतात. त्यामुळे जिल्हास्तरावरील नेतेही मोठी दक्षता या दृष्टीने बाळगूण आहे. यापूर्वी जि. प. मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने मोठा पक्ष म्हणून संख्याबळ असताना काँग्रेस पक्षाला डावलून भाजपसोबत २०१२ मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीत हात मिळवणी केली होती. त्यामुळे नगर पंचायत नगराध्यक्ष निवडणुकीकडेही जनतेचे लक्ष लागून आहे. (जिल्हा प्रतिनिधी)