कृषिपंप जोडणीसाठी विशेष मोहीम
By Admin | Updated: April 1, 2015 01:37 IST2015-04-01T01:36:28+5:302015-04-01T01:37:01+5:30
जे शेतकरी वीज जोडणी करण्यास इच्छूक आहेत, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी, ...

कृषिपंप जोडणीसाठी विशेष मोहीम
गडचिरोली : जे शेतकरी वीज जोडणी करण्यास इच्छूक आहेत, अशा शेतकऱ्यांना तत्काळ वीज जोडणी मिळावी, यासाठी महावितरणतर्फे विशेष मोहीम उघडण्यात आली असून याचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांना २० एप्रिलपर्यंत संबंधित वीज विभागाच्या उपविभागीय कार्यालयाकडे अर्ज करावा लागणार आहे.
शासनाकडून अनुदानावर विहीर उपलब्ध झाल्यानंतर विहिरीच्या पाण्याचा उपयोग करून पीक घेण्याच्या उद्देशाने शेतकरी वर्ग वीज वितरण कंपनीकडे वीज जोडणी करण्यासाठी अर्ज करतात. त्यासाठी आवश्यक असलेले डिमांडही भरले जाते. मात्र वर्षाचा कालावधी उलटूनही वीज जोडणी मिळत नाही. हा नेहमीचाच शेतकऱ्यांना येणारा अनुभव आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये कमालीची निराशा निर्माण झाली होती. याबाबत महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारीही केल्या आहेत. लाखो रूपये खर्चूनही वीज जोडणी नसल्याने शेतकऱ्यांना दुबार पीक घेण्यापासून वंचित राहावे लागत होते.
शेतकऱ्यांची या जाचातून सुटका करण्याच्या उद्देशाने महावितरणने कृषिपंप वीज जोडणीसाठी स्वतंत्र मोहीम सुरू केली आहे. याअंतर्गत शेतकऱ्यांना आवश्यक कागदपत्रांसह नवीन वीज जोडणीचा ए-१ हा अर्ज दाखल करावा लागणार आहे. अर्ज दाखल होताच महावितरणचे कर्मचारी संबंधित शेतकऱ्याला तत्काळ वीज जोडणी करून देणार आहेत. यामुळे वीज जोडणीसाठी वीज वितरण कंपनीचे खेटे घालण्याचा त्रास कमी होणार आहे.
कृषिपंपासाठी अर्ज केल्यानंतर शेतकरी तत्काळ खासगी दुकानातून कृषिपंप खरेदी केले आहे. मात्र वर्षाचा कालावधी उलटूनही जोडणी न झाल्याने सदर कृषिपंपाचे कर्ज शेतकऱ्यांच्या मानगुटीवर बसून आहे. दुसरीकडे खर्च होऊनही सिंचनाअभावी उत्पन्नात वाढ झाली नाही. त्यामुळे शेकडो शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. महावितरणच्या या मोहिमेमुळे तत्काळ वीज जोडणी मिळून त्याचा लाभ शेतकऱ्यांना होण्याची आशा व्यक्त केली जात आहे. (नगर प्रतिनिधी)