अहेरी उपविभागात लोह प्रकल्पासाठी मागितली जागा

By Admin | Updated: November 17, 2016 02:04 IST2016-11-17T02:04:32+5:302016-11-17T02:04:32+5:30

गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर उत्खनन करून लोह प्रकल्प निर्माण करण्यासाठी

The space sought for the iron project in the Aheri subdivision | अहेरी उपविभागात लोह प्रकल्पासाठी मागितली जागा

अहेरी उपविभागात लोह प्रकल्पासाठी मागितली जागा

गडचिरोली : गडचिरोली जिल्ह्यात एटापल्ली तालुक्यात सूरजागड पहाडीवर उत्खनन करून लोह प्रकल्प निर्माण करण्यासाठी खासगी लायड्स मेटल्स कंपनीने दिना नदीच्या अलिकडे अहेरी उपविभागात जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी पत्राद्वारे गडचिरोलीच्या जिल्हाधिकाऱ्यांकडे केली असल्याची विश्वसनिय माहिती मिळाली आहे.
२००६ मध्ये लायड्स मेटल्ससह जवळजवळ १० खासगी कंपन्यांना गडचिरोली जिल्ह्यात सुरजागड, कोरची तालुक्यात झेंडेपार आदी ठिकाणी उत्खननासाठी लिज मंजूर करण्यात आली होती. मात्र मागील १० वर्षांपासून येथे कोणतेही काम सुरू झाले नाही. लायड्स मेटल या कंपनीने २०१६ मध्ये एटापल्ली तालुक्यात उत्खननाचे काम सुरू केले आहे. मात्र स्थानिक ग्रामसभा व काही सामाजिक संघटनांचा कंपनीने येथेच उद्योग उभारावा, असा आग्रह आहे. तर काही राजकीय पक्षांनी हा प्रकल्प दिना नदीच्या पुढे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेतली आहे. गडचिरोली जिल्ह्यातील स्थानिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने लायड्स मेटल कंपनीने जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे दिना नदीच्या अलिकडे अहेरी उपविभागात जमीन प्रकल्प उभा करण्यासाठी उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी केली आहे. या भागात बहुतांशी जमीन ही वन जमीन आहे. ती जमीन घेताना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाची मंजुरी आवश्यक आहे. या सर्व तांत्रिक मंजुरी जिल्हा प्रशासनाने पुढाकार घेऊन केंद्र व राज्य सरकारकडून मिळवून द्यावा व जमिनही मिळवून द्यावी. त्याचा मोबदला कंपनी देईल, असा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे पत्राद्वारे ठेवला असल्याची माहिती मिळाली आहे. या संदर्भात जिल्हा प्रशासनाकडून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता, ती मिळू शकली नाही. मात्र कंपनीने अहेरी उपविभागात प्रकल्प उभा करण्याबाबत आता ठोस भूमिका घेतली असल्याचे समजते. या कंपनीच्या उत्खनन कामाला एटापल्ली तालुक्यातील काही ग्रामसभांनी विरोध केला आहे. मात्र हा प्रकल्प गडचिरोली जिल्ह्यातच होईल, अशी भूमिका पालकमंत्र्यांसह अनेकांनी यापूर्वीही घेतली आहे. शिवाय या भागात रेल्वे मार्गही नेला जाणार असल्याचे पालकमंत्र्यांनी जाहीर केले आहे. त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यात भविष्यात लोहखनिज प्रकल्प उभा राहण्याची शक्यता आहे. जिल्हा प्रशासन कंपनीच्या या पत्रावर आता काय भूमिका घेते हे महत्त्वाचे राहणार आहे. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: The space sought for the iron project in the Aheri subdivision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.