सोयाबीनला फुटले अंकूर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 30, 2019 05:00 IST2019-10-30T05:00:00+5:302019-10-30T05:00:44+5:30
गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे. गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जातात. अनेक शेतकरी सोयाबिन पिकाची लागवड करतात.

सोयाबीनला फुटले अंकूर
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी/गडचिरोली : ऐन दिवाळी सणाच्या कालावधीत खरीप हंगामातील कपाशी व सोयाबिन ही पिके हातात येण्यासाठी अत्यल्प काळ शिल्लक असताना अवकाळी पावसाने कहर केला. चामोर्शी तालुक्यासह जिल्ह्याच्या विविध भागात गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी पाऊस बरसत असून काही शेतामध्ये पाणी साचले आहे. पावसामुळे अंतिम टप्प्यात असलेल्या सोयाबीनला अंकूर फुटले आहे. परिणामी शेतकरी संकटात सापडला आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात धान पिकासोबतच कपाशी व सोयाबिन पिके घेतली जातात. अनेक शेतकरी सोयाबिन पिकाची लागवड करतात. चामोर्शी तालुक्यात यंदा शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सोयाबिन पिकाची पेरणी केली होती. सोयाबिन पीक कापणी योग्य तयार झाले आहे. मात्र अवकाळी पावसामुळे सोयाबिनच्या शेंगांमधून कोंब बाहेर येऊ लागले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रचंड नुकसान सहन करावे लागत आहे. असे असतानासुद्धा प्रशासनाच्या वतीने अद्यापही सर्वेक्षण व पंचनाम्याची कार्यवाही हाती घेण्यात न आल्याने चामोर्शी तालुक्यासह जिल्हाभरातील नुकसानग्रस्त शेतकरी नुकसान भरपाईपासून वंचित राहण्याची शक्यता आहे.
चामोर्शी तालुक्यातील लक्ष्मणपूर, मुधोली रिठ, विठ्ठलपूर, गणपूर रै., जैैरामपूर, किष्टापूर, दुर्गापूर, कोनसरी, सोमनपल्ली, धर्मपूर, वायगाव, प्रियदर्शनी, रेश्मीपूर, राजगोपालपूर आदी गावातील शेतकऱ्याच्या सोयाबिन पिकाचे पावसामुळे मोठे नुकसान झाले आहे. नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शासनाकडून नुकसानभरपाई देण्यात यावी, अशी मागणी माजी उपसरपंच नीलकंठ निखाडे यांच्यासह चामोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यानी केली आहे. विठ्ठलपूर परिसरातील शेतकऱ्याना दरवर्षी संकटाचा सामना करावा लागतो.
तुरीसह भाजीपाला पिकालाही फटका
चामोर्शी तालुक्यात तूर व भाजीपाला पिकाचेही क्षेत्र मोठे आहे. गेल्या पाच-सहा दिवसांपासून अवकाळी होत असल्याने खरीप हंगामातील खरीप हंगामातील पिकांना फटका बसला आहे. तुरीचे झाड वाकले असून भाजीपाला पिकाचेही नुकसान झाले आहे. ढगाळी वातावरणामुळे पिकांवर रोगांचा प्रादुर्भावही होत आहे.