सोयाबीनने हिरावला दिवाळीचा आनंद
By Admin | Updated: October 26, 2014 22:41 IST2014-10-26T22:41:13+5:302014-10-26T22:41:13+5:30
सोयाबीन कापणीसाठी दिवाळीपूर्वी गेलेल्या मजुरांना दिवाळीसाठी परतता आले नाही. त्यामुळे हजारो मजुरांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे.

सोयाबीनने हिरावला दिवाळीचा आनंद
गडचिरोली : सोयाबीन कापणीसाठी दिवाळीपूर्वी गेलेल्या मजुरांना दिवाळीसाठी परतता आले नाही. त्यामुळे हजारो मजुरांना दिवाळीच्या आनंदापासून वंचित राहावे लागले आहे.
गडचिरोली जिल्ह्यात धानपिकाचे उत्पादन घेतले जाते. मात्र सिंचनाची सुविधा उपलब्ध नसल्याने रोवलेले धानपिक हातात येईलच याची शाश्वती राहत नाही. त्यामुळे बहुसंख्य शेतमजूर व अल्प भूधारक शेतकरी मजुरी करूनच जीवन जगतात. येथील मजुरांना धानपिकाच्या रोवणीपासून ते धानपिकाचे निंदन काढेपर्यंत गावातच रोजगार उपलब्ध होतो. निंदनाची कामे झाल्यानंतर धान कापणीदरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीत धानपिकासंबंधित विशेष कामे राहत नसल्याने मजुरांना रोजगार उपलब्ध होत नाही.
विदर्भातील चंद्रपूर, यवतमाळ, वर्धा, नागपूर या जिल्ह्यांमध्ये सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते. सोयाबीन पिकाची दसऱ्याच्या आठ दिवसांपूर्वीच कापणी पूर्ण होते. हा दरवर्षीचा शेतकऱ्यांचा अनुभव आहे. यावर्षीमात्र उशिरा पाऊस पडल्याने सोयाबीन पिकाच्या पेरणीला उशिर झाला. परिणामी सोयाबीन पीक उशिरा परिपक्व झाले. त्याचबरोबर यावर्षी दिवाळीचा सण १५ दिवसांनी अगोदर आला आहे. यावर्षी दिवाळी सणाच्या जेमतेम चार दिवसांपूर्वीच कापणीला सुरूवात झाली. सोयाबीन कापणीसाठी गडचिरोली जिल्ह्यातील हजारो मजुरांनी आठ दिवसांपूर्वीच घरून निघाले होते. मध्यंतरी दिवाळीचा सण आला. मात्र केवळ दिवाळी सण साजरा करण्यासाठी हजारो रूपये खर्च करून तसेच दिवसाची मजुरी बुडवून येणे शक्य नसल्याने यावर्षी मजूर परतलेच नाही. संपूर्ण जग दिवाळीचा आनंद साजरा करत असतांना मजुरांना मात्र वावरात सोयाबीन कापनीचे कष्ट उपसावे लागत होते. दिवाळी सणासाठी पैसाही उपलब्ध नसल्याने घरी असलेल्या व्यक्तींना उधारवाडी आणूनच दिवाळीचा सण साजरा करावा लागला.
सोयाबीन कापणीसाठी गेलेले मजूर एकराप्रमाणे सोयाबीन कापणीचा हुंडा घेऊन काम करतात. सकाळीच कामाला सुरूवात करून रात्री ७ ते ८ वाजेपर्यंत सोयाबीन कापणे व जमा करण्याचे काम करीत असल्याने दिवसाकाठी ५०० ते ६०० रूपये मजुरी पडते. २० दिवस चालणाऱ्या या कामातून ८ ते १० हजार रूपये कमाई होते. ऐवढे उत्पन्न दोन एकर धानाची शेती केल्यानंतरही होत नाही. त्यामुळे मजूर सोयाबीन पिकाच्या कापणीचा हंगाम कोणत्याही परिस्थितीत सोडत नाही.
रोजगाराच्या साधनाअभावी येथील शेतमजुराला दिवाळीच्या आनंदापेक्षा पोट भरण्याची चिंता सर्वाधिक राहते. त्यामुळे सोयाबीन कापणीचा हंगाम सोडणे या मजुरांना अशक्य होते. गावातील जवळपास ५० टक्के शेतमजूर सोयाबीन कापणीसाठी गेली असल्याने गावकऱ्यांनाही दिवाळीचा आनंद पाहिजे त्या प्रमाणात लुटता आला नाही. मजुरीसाठी दहाही दीशा वनवन भटकण्याची येथील मजुरांना सवयच झाली आहे.
पावसाळ्यादरम्यानही चंद्रपूर जिल्ह्यात धानाची रोवणी करण्यासाठी हजारो मजूर जातात. धानपिकाची रोवणीदरम्यान कधीकधी पोळ्याचा सण येत असल्याने हा सणसुद्धा दुसऱ्यागावी साजरा करावा लागतो. मात्र पोटासाठी मन मारून हे सर्व कष्ट उपसावेच लागतात. गडचिरोली जिल्ह्यात रोजगाराचे साधन नसल्याने वनवन भटकण्याशिवाय मजुरांसमोर दुसरा कोणताही पर्याय शिल्लक नाही. सणाचा आनंद घेतो म्हटला तर कुटुंबाचे पोट उपाशी राहण्याची पाळी येते. त्यामुळे रोजगार उपलब्ध होणे आवश्यक आहे. (नगर प्रतिनिधी)