Sowing Rabi season by machine | यंत्राद्वारे रबी हंगाम पेरणी

यंत्राद्वारे रबी हंगाम पेरणी

ठळक मुद्देकृषी विभाग व आत्माचा पुढाकार : कोरची तालुक्यात प्रथमच उपक्रम

लोकमत न्यूज नेटवर्क
कोरची : शेती व्यवसायात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर वाढला आहे. पेरणीपासून मळणीपर्यंत व मशागतीची कामे यंत्राद्वारे केली जात आहेत. कोरची तालुक्यातही शेतीत यंत्राचा वापर वाढला आहे. तालुका कृषी अधिकारी कार्यालय, कृषी विज्ञान केंद्र व आत्माच्या पुढाकाराने तालुक्यात पहिल्यांदाच पेरणी यंत्राद्वारे रबी हंगामात बियाण्यांची पेरणी करण्यात आली.
कोरची तालुक्यातील शेतकरी पारंपरिक पद्धतीने बियाणे टाकून रबी पिकाची लागवड करतात. परंतु बियाणे फेकून पेरणी केल्याने बरेचशे बियाणे वापत नाही. तसेच रोपांची संख्याही कमी होते. उत्पादनात घट येते. यावर्षी खरीप हंगामात उशिरापर्यंत पाऊस आल्याने जमिनीत पुरेसा ओलावा आहे. रबी पिकाचे क्षेत्र वाढविणे व शेतकऱ्यांच्या उत्पादनात वाढ होण्याच्या उद्देशाने तालुका कृषी अधिकारी, कृषी विज्ञान केंद्र व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) यांच्या पुढाकाराने तालुक्यात रबी हंगामातील बियाण्यांची पेरणी केली जात आहे.
तालुक्यातील मुलेटीपदीकसा, खुर्सीपार, हितकसा आदी गावातील २० हेक्टर क्षेत्रावर हरभरा, जवस पिकाची पेरणी यंत्राद्वारे करण्यात आली. इतर गावांमध्येही यंत्राणे पेरणी केली जात आहे. त्यामुळे बियाण्यांची बचत होऊन ठरावित अंतरावर पेरणी करण्यास मदत मिळते. बियाणे जमिनीत ठराविक खोलीपर्यंत जात असल्याने बी रूजण्याचे प्रमाण तसेच रोपांची संख्या अधिक होते. त्यामुळे पिकाच्या उत्पादनातही वाढ होते. तालुक्यातील अनेक शेतकरी यंत्राद्वारे पेरणी करण्याकडे वळले आहेत. त्यामुळे वेळ व मानवी श्रमाची बचत होत आहे. सदर उपक्रम राबविण्याकरिता तालुका कृषी अधिकारी एल. ए. कटरे, विषयतज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक पी. के. जनबंधू, एच. एम. रावटे यांनी पुढाकार घेतला.

Web Title: Sowing Rabi season by machine

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.