भूमीगत पुलाचा प्रश्न मार्गी लावा
By Admin | Updated: June 17, 2016 01:22 IST2016-06-17T01:22:06+5:302016-06-17T01:22:06+5:30
देसाईगंज येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी भूमीगत पूल आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे निर्देश

भूमीगत पुलाचा प्रश्न मार्गी लावा
कामाचा घेतला आढावा : मंडळ रेल्वे प्रबंधकांचे रेल्वे विभागाच्या अधिकाऱ्यांना निर्देश
देसाईगंज : देसाईगंज येथील वाहतुकीची समस्या सोडविण्यासाठी भूमीगत पूल आवश्यक आहे. त्यामुळे या पुलाचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा, असे निर्देश दक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेचे मंडळाचे रेल्वे प्रबंधक अमितकुमार अग्रवाल यांनी केले. गुरूवारी त्यांनी वडसा रेल्वेस्थानकाला आकस्मिक भेट देऊन विकास कामांचा आढावा घेतला. याप्रसंगी अधिकाऱ्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
यावेळी दक्षिण-पूर्व मध्यरेल्वेचे वरिष्ठ यातायात प्रबंधक सचिन शर्मा, बांधकाम मुख्य अभियंता पांडे, वरिष्ठ मंडळ संकेत तथा दूरसंचार अभियंता आर. ए. हांडे, नागपूरचे वरिष्ठ अभियंता पी. व्ही. व्ही. सत्यनारायण, बांधकाम अभियंता पात्रो, सहायक सी. ई. ई. शालिकराम, वाणिज्य निरिक्षक रवींद्र पाटील, डी. एस. कोराम, सहायक अभियंता गुप्ता, नागभिडचे अभियंता पांडे, स्टेशन अधीक्षक पी. एस. भोंडे, रेल्वे सल्लागार समिती सदस्य डॉ. विष्णू वैरागडे, ऋषी शेबे, स्टेशन मास्टर रितेशकुमार आदी प्रामुख्याने उपस्थित होते. मंडळ रेल्वे प्रबंधक अमितकुमार अग्रवाल यांनी बांधकाम, यातायात, विद्युत, संकेत व दूरसंचार, पाणी पुरवठा, प्रवाशी निवारा आदी विभागांच्या प्रमुखांशी सविस्तर चर्चा केली. वडसा रेल्वेस्थानकावर एक रेल्वे भवन उभारले जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या ठिकाणी असलेल्या समस्या मार्गी लावण्याचे निर्देश दिले.
त्यानंतर डीआरएम अमितकुमार अग्रवाल यांनी गडचिरोली येथे भेट देऊन येथील रेल्वे तिकीट काऊंटरची पाहणी केली व वडसा-गडचिरोली मार्गाचे भूमिअधिग्रहण पूर्ण झाल्याशिवाय या कामाला गती मिळणार नाही, असे स्पष्ट केले. (वार्ताहर)