सिरोंचाच्या खंडीत वीज पुरवठ्यावर निघणार तोडगा
By Admin | Updated: October 6, 2015 01:57 IST2015-10-06T01:57:55+5:302015-10-06T01:57:55+5:30
आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान

सिरोंचाच्या खंडीत वीज पुरवठ्यावर निघणार तोडगा
गडचिरोली : आलापल्लीवरून सिरोंचाचा वीज पुरवठा हा संपूर्ण जंगलातून होतो. पावसाळ्यात तसेच इतर काळातही लहानसहान कारणाने हा वीज पुरवठा खंडीत होत असतो. अनेकदा वीज तारा जंगलात तुटल्याने अडचण येऊन पाच-पाच दिवस वीज पुरवठा सुरू होत नाही. या अडचणीवर आता तोडगा निघणार आहे. अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे नवे ३३ केव्ही वीज उपकेंद्र निर्माण केले जाणार आहे. त्यामुळे आलापल्ली ते सिरोंचा जाणारा वीज प्रवाहाच्या विद्युत वाहिनीला आता जिमलगट्टा येथे ब्रेक मिळून सिरोंचाला येथून वीज पुरवठा होईल. जिमलगट्टासह पुराडा व अडपल्ली येथेही नवे ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र निर्माण होणार आहे.
गडचिरोली जिल्ह्यात पहिल्या टप्प्यात ३३ केव्हीचे तीन उपकेंद्र कुरखेडा तालुक्याच्या पुराडा, मुलचेरा तालुक्याच्या अडपल्ली तर अहेरी तालुक्याच्या जिमलगट्टा येथे पूर्ण करण्यात येणार आहे. आलापल्ली-सिरोंचा या मार्गावरून जंगलातून वीज तारा जातात. अनेकदा या तारा लोंबकळल्यामुळे येथील वीज पुरवठा बंद पडून जातो. पावसाळ्यात या घटना वारंवार घडतात व हा वीज पुरवठा बंद झाल्याने या भागात चार ते पाच दिवस तो खंडीतच राहतो. याबाबत सातत्याने तक्रारी होत्या. त्यानंतर आता या मार्गावर जिमलगट्टा येथे वीज उपकेंद्र होऊ घातल्या आहेत. तसेच कुरखेडा, कोरची या भागासाठी पुराडा येथे वीज उपकेंद्र दिले जाणार आहे. कोरची तालुक्याला वीज पुरवठा करण्यासाठी याची मदत होणार आहे. तर मुलचेरा तालुक्यातील अडपल्ली या दुर्गम गावामध्ये वीज उपकेंद्र निर्माण झाल्यास त्याचा फायदा एटापल्ली, मुलचेरा या दोन्ही तालुक्यांना होईल. या उपकेंद्रासाठी ४ कोटी ४४ लाख रूपयांची निधीची तरतूद करण्यात आली आहे.
उपकेंद्र रोहित्र क्षमता वाढीचे दोन काम ९० लाख रूपये निधीतून केले जाणार असून ४९.७७ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे. यासाठी ७ कोटी ७३ लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे.
६२.२० किमी लांबीच्या लघुदाब वाहिनीसाठी १ कोटी रूपयांच्या निधीची तरतूद करण्यात येणार आहे. वाहिन्यांचे विलगीकरणाचे सात कामे असून घरगुती वीज जोडणीचे २६ हजार ११३ कामे जिल्ह्यात प्रस्तावित करण्यात आले.
दुसऱ्या टप्प्यात ७ कोटी ७९ लाखांची पाच विद्युत उपकेंद्र निर्माण करण्यात येणार आहे. ३३५ किमीची ११ केव्ही उच्चदाब वाहिनी ३३ कोटी ४४ लाख रूपये खर्च करून उभारण्यात येणार आहे. दोन्ही टप्प्यामध्ये १६६ विद्युत वितरण रोहित्र ४ कोटी २४ लाख रूपये खर्च करून बसविण्यात येणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ११० किमी लघुदाब वाहिनी निर्माण करण्यात येणार आहे.
या सर्व कामांमुळे जिल्ह्यातील वीज नसलेल्या जवळजवळ १२२ गावांनाही वीज पुरवठा सुरू होण्याची शक्यता आहे. शासनाने दिनानाथ उपाध्याय ग्रामज्योती योजना लागू केली असल्यामुळे निधीची उपलब्धता मोठ्या प्रमाणावर होईल, असे दिसून येत आहे. या संदर्भात खासदार अशोक नेते यांनी नुकताच आढावा घेतला. त्यामुळे या कामाला गती दिली जाणार आहे. या कामासाठी निधीचीही तरतूद झाली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)