सौरऊर्जेने बोटनफुंडीला २४ तास पाणीपुरवठ्याची सोय
By Admin | Updated: December 10, 2015 01:40 IST2015-12-10T01:40:36+5:302015-12-10T01:40:36+5:30
स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर आपल्या परिसरातील अनेक गावातील नागरिक नाले व झरे यांचे पाणी पिऊन जगतात,

सौरऊर्जेने बोटनफुंडीला २४ तास पाणीपुरवठ्याची सोय
दुहेरी नळ योजना कार्यान्वित : नागरिकांनी व्यक्त केला आनंद
भामरागड : स्वातंत्र्याच्या ६८ वर्षांनंतर आपल्या परिसरातील अनेक गावातील नागरिक नाले व झरे यांचे पाणी पिऊन जगतात, हे ज्यांनी गेली अनेक वर्ष अनुभवले अशाच गावांमधील एक म्हणजे बोटनफुंडी. मात्र आता येथे सौरऊर्जेवरील आधारित दुहेरी नळ पाणीपुरवठा योजना कार्यान्वित झाली आहे व या गावाच्या पाणीपुरवठ्याचे चित्रच कायमचे बदलून गेले आहे. जे लोक झरे व नाल्याचे पाणी पिऊन राहत होते, त्यांना आता शुद्ध मुबलक स्वरूपात २४ तास नियमित पाणी पुरवठा होत आहे. ही नळ योजना कार्यान्वित झाल्याचा आनंद बोटनफुंडीवासीयांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून येत आहे.
भामरागड पंचायत समितीअंतर्गत मैथा, बोटनफुंडी गावात पाणी पुरवठा स्वच्छता विभागाने सौरऊर्जेवर आधारित दुहेरी नळ योजना सुरू केली. त्यामुळे गावातील पाणीटाकीमध्ये पाण्याची साठवणूक करून गावात चार ठिकाणी सार्वजनिक नळ लावून २४ तास नियमित पाणी पुरवठा सुरु करण्यात आला आहे. त्यामुळे ग्राम पंचायत प्रशासनाप्रती नागरिकांनी समाधान व्यक्त करून मुबलक पाणी उपलब्ध केल्याबद्दल गावात आनंद व्यक्त केला आहे. यापुढे घर कर व पाणी कर नियमितपणे भरणा करून पाणीपुरवठा योजना व्यवस्थित सुरू ठेवण्याचा संकल्प ग्रामस्थांनी केला आहे. भामरागड तालुक्यातील बोटनफुंडीसारख्या अतिदुर्गम भागात सौर ऊर्जेवरील दुहेरी पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आल्याने या भागातील नागरिकांना आता २४ तास पाणी उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. (तालुका प्रतिनिधी)