सोलर कृषी पंपांनी फुलले दुर्गम भागातील माळरान
By Admin | Updated: March 15, 2015 01:09 IST2015-03-15T01:09:04+5:302015-03-15T01:09:04+5:30
एटापल्ली व भामरागड या दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. अशा २२ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपांचा पुरवठा करण्यात आला आहे.

सोलर कृषी पंपांनी फुलले दुर्गम भागातील माळरान
गडचिरोली : एटापल्ली व भामरागड या दुर्गम भागातील गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. अशा २२ गावांमधील शेकडो शेतकऱ्यांना सोलर कृषी पंपांचा पुरवठा करण्यात आला आहे. या कृषी पंपांनी शेकडो हेक्टर शेतीला पाणी दिले जात असून आजपर्यंत ओसाड असलेले माळरान आता हिरवेगार दिसायला लागले आहे.
गडचिरोली तालुक्यातील एटापल्ली व भामरागड हे दोन तालुके जंगलाने व्यापलेले व अतिशय दुर्गम आहेत. यातील अनेक गावांपर्यंत वीज पोहोचली नाही. या गावांमधील अनेक शेतकरी दुबार पीक घेण्यासाठी ईच्छुक होते. त्याचबरोबर कृषी विभाग अनुदानावर कृषी पंप उपलब्ध करून देण्यास तयारही होता. मात्र वीज नसल्याने हे सर्व काम ठप्प पडले होते. वीज विभाग वीज उपलब्ध करून देण्यास तयारी दर्शवित असला तरी झाडे तोडून विद्युत खांब उभारू देण्यास वनविभाग तयार झाला नाही. परिणामी या गावांपर्यंत विजेचा पुरवठा करणे अशक्य बनले होते.
यावर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागाने पर्याय शोधत २२ गावांमधील आदिवासी शेतकरी गटांना मागील वर्षी सोलर कृषी पंपाचे वाटप केले. याचा लाभ घेत शेतकऱ्यांनी दुबार पीक घेणे सुरू केले आहे. सद्य:स्थितीत या दोन तालुक्यातील शेकडो हेक्टर जमीन सोलर कृषी पंपाच्या माध्यमातून ओलीताखाली आली आहे. एका पाण्याने मरणारे धानाचे पिकही आता पूर्णपणे होऊ लागले आहे. सोलर कृषी पंपामुळे वीज बिल देण्याची गरज शेतकऱ्यांना राहिली नाही. सोलर कृषी पंप सर्वसाधारण वीज पंपापेक्षा महाग असल्याने सदर पंप अनुदानाशिवाय खरेदी करणे अशक्य आहे. त्यामुळे इतर शेतकऱ्यांनाही अशा प्रकारचे कृषी पंप देण्याची मागणी आहे. (नगर प्रतिनिधी)