स्नेहादेवी आत्राम यांचे निधन
By Admin | Updated: March 29, 2015 01:26 IST2015-03-29T01:26:16+5:302015-03-29T01:26:16+5:30
माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या धर्मपत्नी व भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्नेहादेवी आत्राम यांचे शनिवारी दुपारी १२.३० वाजता ...

स्नेहादेवी आत्राम यांचे निधन
अहेरी : माजी राज्यमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्या धर्मपत्नी व भगवंतराव मेमोरियल शिक्षण संस्थेच्या अध्यक्ष स्नेहादेवी आत्राम यांचे शनिवारी दुपारी १२.३० वाजता अहेरी येथील राजवाड्यामध्ये निधन झाले. मृत्यूसमयी त्या ५८ वर्षाच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्या कर्करोगाच्या आजाराने ग्रस्त होत्या. त्यांच्यावर नागपूर येथे उपचार करण्यात आले. त्यानंतर त्यांना गडचिरोली येथेही ठेवण्यात आले होते. शनिवारी पहाटे त्यांना अहेरी येथे नेण्यात आले. त्यानंतर दुपारी त्यांची प्राणज्योत मावळली.
स्नेहलतादेवी यांचा जन्म १४ डिसेंबर १९५७ रोजी तत्कालीन मध्यप्रदेश राज्यातील राजनांदगाव जिल्ह्यातील मोहल्ला तालुक्यातील पानाबरस येथे झाला. पानाबारसचे माजी खासदार व जमीनदार राजे लालशाम शहा यांचे धाकटे बंधू निजाम शहा यांच्या त्या द्वितीय कन्या होत.
१७ डिसेंबर १९८० ला त्यांचा धर्मरावबाबा आत्राम यांच्याशी विवाह झाला. स्नेहादेवी यांच्या पश्चात पती धर्मरावबाबा, मुलगी माजी जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री आत्राम-हलगेकर, तनुश्री व हर्षवर्धन असे तीन मुले, जावई ऋतूराज हलगेकर, दीर, नातवंड असा बराच मोठा आप्त परिवार आहे.
धर्मरावबाबा आत्राम यांच्या राजकीय वाटचालीत स्नेहादेवी यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. स्नेहादेवी या पुष्पप्रियादेवी शिक्षण मंडळाच्याही अध्यक्ष आहेत. धर्मरावबाबा आत्राम राजकारण, समाजकारणात असताना मोठे कुटुंब सांभाळून स्नेहादेवी यांनी आपली कौटुंबिक जबाबदारी अतिशय यशस्वीपणे सांभाळली.
स्नेहादेवी यांना दोन बहिणी आहेत. त्यांच्या पार्थीवावर रविवारी अहेरी येथील राजघाटावर सकाळी ११ वाजता अंतिम संस्कार करण्यात येणार आहे. आज त्यांचे पार्थिव अहेरी येथे निवासस्थानी ठेवण्यात आले. यावेळी शेकडो नागरिकांनी त्यांचे अंतिम दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत अहेरी उपविभागातील शेकडो कार्यकर्ते, नागरिक यांची अंतिम दर्शन घेण्यासाठी रिघ लागून होती. (तालुका प्रतिनिधी)