लघु व्यावसायिक आर्थिक संकटात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2021 04:38 IST2021-05-27T04:38:51+5:302021-05-27T04:38:51+5:30
चामाेर्शी : शहरात शेकडो लघु व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे या वर्षी ...

लघु व्यावसायिक आर्थिक संकटात
चामाेर्शी : शहरात शेकडो लघु व्यावसायिक अनेक वर्षांपासून व्यवसाय करून कुटुंब चालवत आहेत. मात्र, कोरोना संकटामुळे या वर्षी त्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे कुटुंब कसे चालवावे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. लघु व्यवसाय करणाऱ्यांची दैनंदिन आवक रोजच्या आर्थिक घडामोडीवर अवलंबून असते. मात्र, कोरोनामुळे सर्व व्यवहार डबाघाईस आले आहेत.
परवाना शिबिराचे आयोजन करावे
काेरची : तालुक्यात दिवसेंदिवस वाहनधारकांची संख्या वाढत आहे. मात्र, अनेकांजवळ वाहन चालविण्याचा परवाना नाही. उपप्रादेशिक परिवहन विभागाच्यावतीने तालुक्याच्या ठिकाणी ठराविक दिवशी शिबिर आयोजित केले जाते. मात्र, कोरोनामुळे अशा शिबिराचे आयोजन बंद केले आहे.
जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी
आलापल्ली : मोकाट जनावरांमुळे नागरिक हैराण झाले आहेत. रस्त्यावर ही जनावरे उभी राहत असल्याने मार्ग काढण्यास अडचणी येतात. त्यामुळे अपघाताचा धोका निर्माण झाला. मोकाट कुत्रे दुचाकीस्वारांच्या मागे धावतात. त्यामुळे या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी आहे.
अपंग विवाह अनुदान योजनेची जागृती करा
आष्टी : संपूर्ण महाराष्ट्रात शासनाच्यावतीने अपंग युवक, युवतींसाठी कल्याण विवाह अनुदान योजना राबविण्यात येत आहे. जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण विभागामार्फत अपंग कल्याण विवाह योजना राबविली जाते. मात्र, या योजनेची जनजागृती करण्यात येत नसल्याने, अनेक अपंग युवक, युवती योजनेबाबत अनभिज्ञ आहेत.
व्यावसायिकांमुळे वाहतुकीला अडथळा
गडचिरोली : येथील इंदिरा गांधी चौकात मुख्य मार्गाच्या कडेला अनेक किरकोळ दुकानदार दिवसभर हातगाडी लावून विविध साहित्य विकत असतात. त्यामुळे वाहतुकीला अडथळा होत आहे. गांधी चाैकात सायंकाळी ४ वाजताच्या सुमारास दुचाकी व हातठेल्यांची गर्दी असते. पालिका प्रशासन कारवाईबाबत सुस्त असल्याचे दिसून येते.
औद्योगिक वसाहती स्थापन करा
गडचिरोली : जिल्ह्यात उद्योगाला चालना देण्यासाठी चामोर्शी, आष्टी, आलापल्ली येथे औद्योगिक वसाहत निर्माण करण्यात यावी. या ठिकाणी स्थापन करण्यात येणाऱ्या उद्योगांना ५० टक्के सूटवर वीज, पाणी, जागा व इतर सवलती देण्यात याव्या, अशी मागणी आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष आहे.
खांब गाडणाऱ्यांवर कारवाई करा
गडचिरोली : शहरातील मुख्य मार्गावर, तसेच अंतर्गत मार्गावर काही नागरिक फलक लावण्यासाठी मार्गावर खड्डा खोदतात. नंतर खड्डा तसाच ठेवला जातो. परिणामी, अपघात होण्याची शक्यता आहे.
वर्दळीच्या रस्त्यावर वाढले अतिक्रमण
गडचिराेली : शहरातील मुख्य रस्त्यावरील अतिक्रमण वाढत आहे. त्यामुळे रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. कोरोनानंतर प्रशासनाने शिथिलता दिल्याने वाहने रस्त्यावर धावत आहेत. परंतु, रस्त्याच्या कडेला काही व्यावसायिकांनी अतिक्रमण केले आहे.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
देसाईगंज : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावात विजेचा लपंडाव सुरू आहे. त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच देसाईगंज तालुक्यातील अनेक विद्युत तारा लोंबकळल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे थोडी हवा आली तरी विद्युत पुरवठा खंडित होतो. कृषी पंपधारक शेतकरी रब्बी पिकाची तयारी करीत आहे. अशा वेळी अखंडित वीज पुरवठा करणे गरजेचे आहे. याकडे वीज वितरण कंपनीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.
कोंडवाड्यातील जनावरे असुरक्षित
आरमाेरी : जिल्ह्यात अनेक गावांमध्ये ग्रामपंचायतीने कोंडवाडे बांधले आहे. मात्र, कोंडवाड्याची दुरवस्था झाली आहे. कोंडवाड्यामध्ये चारा व जनावरांना पिण्यासाठी पाण्याची सोय करणे कठीण झाले आहे.
निराधार प्रकरणांचा निपटारा करावा
चामाेर्शी : संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थ्यांंची प्रकरणे तातडीने निकाली काढून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना न्याय देण्याची मागणी लाभार्थ्यांनी केली आहे.
घरपट्टे मिळण्यास विलंब
गडचिरोली : शहरात गोकुलनगर, रामनगर, इंदिरानगर, विवेकानंदनगर, विसापूर हेटी या परिसरात अतिक्रमण करून हजारो कुटुंब वास्तव्यास आहेत. मात्र, अद्यापही जागेचे पट्टे देण्यात आले नाही. पंतप्रधान आवास योजनेंतर्गत घर बांधकामासाठी स्वत:च्या मालकीची जागा पाहिजे.
शौचालय, स्वच्छतागृहे बांधण्याची मागणी
चामोर्शी : तालुक्यातील लखमापूर बोरी बसथांब्यावर भेंडाळा, मूल, चामोर्शी, आष्टी, गोंडपिंपरी व चपराळा, आदी ठिकाणासाठी दररोज बसेस जातात. या ठिकाणी प्रवाशांची मोठी गर्दी असते. त्यामुळे येथे शौचालय व स्वच्छतागृहे उभारण्यात यावी, अशी मागणी लखमापूर बोरी परिसरातील नागरिकांनी केली आहे.
वसा येथील प्रवासी निवारा जीर्ण
गडचिरोली : आरमोरी मार्गावर असलेल्या गडचिरोली तालुक्यातील वसा येथील प्रवासी निवाऱ्याची प्रचंड दुरवस्था झाली आहे. या प्रवासी निवाऱ्याचे छत वादळामुळे पूर्णत: उडाले आहे. प्रवासी निवाऱ्याला वनस्पतींनी वेढा घातला असून, भिंतींना तडे गेले आहेत. त्यामुळे प्रवाशांना धोका होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
आंतरराज्यीय मार्गावर पूल उंच करा
गडचिरोली : चंद्रपूर-गडचिरोली-धानोरा-राजनांदगाव या आंतरराज्यीय महामार्गावर येणाऱ्या चातगाव ते कारवाफा या मार्गावरील ठेंगण्या पुलाची उंची वाढविण्यात यावी, अशी मागणी या परिसरातील नागरिकांनी केली आहे. आंतरराज्यीय महामार्गावरून अनेक लोक कारवाफा मार्गे पाखांजूर, छत्तीसगडकडे जातात. पावसाळ्यात ठेंगण्या पुलामुळे हा मार्ग बंद राहतो.
जिल्ह्यात अपुरी अग्निशमन व्यवस्था
एटापल्ली : १० लाख लोकसंख्या असलेल्या गडचिरोली जिल्ह्यात १२ तालुक्यांमध्ये १६४८ गावे आहेत. घटनांच्यावेळी मदतीला धावून जाणारे केवळ चार अग्निशमन वाहन जिल्ह्यात आहेत. प्रत्येक तहसीलला अग्निशमन यंत्र उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे.
जनावरांचे आरोग्य धोक्यात
गडचिरोली : शहरात अनेक मोकाट जनावरे फिरत असतात. पोटाची खळगी भरण्यासाठी परिसरात फेकलेला केरकचरा, प्लास्टिक जनावरे खात असल्याने जनावरांचे आरोग्य धोक्यात आले आहे. अनेकदा जनावरांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही येथे घडल्या आहेत.