फटाके विक्रीवर मंदीचे सावट
By Admin | Updated: October 25, 2014 22:40 IST2014-10-25T22:40:37+5:302014-10-25T22:40:37+5:30
दिवाळीत दरवर्षी देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांच्या फटाक्यांची विक्री व्हायची मात्र यावर्षी फटाके विक्रीवर मंदीचे सावट असल्याचे दिसून आले. कोट्यवधींची विक्री लाखांवर आली असल्याची माहिती

फटाके विक्रीवर मंदीचे सावट
महेंद्र चचाणे - देसाईगंज
दिवाळीत दरवर्षी देसाईगंज शहरात कोट्यवधी रूपयांच्या फटाक्यांची विक्री व्हायची मात्र यावर्षी फटाके विक्रीवर मंदीचे सावट असल्याचे दिसून आले. कोट्यवधींची विक्री लाखांवर आली असल्याची माहिती फटाके विक्रेत्यांनी दिली.
दिवाळी सण फटाके फोडून साजरा करण्याची प्रथा मागील काही वर्षांपासून रूढ झाली आहे. देसाईगंज हे गडचिरोली जिल्ह्यातील औद्योगिक दृष्टीने प्रगत शहर मानल्या जाते. जिल्हाभरातील नागरिक असंख्य वस्तूंची खरेदी करण्यासाठी देसाईगंज बाजारपेठेत येतात. दिवाळीच्या दरम्यान कपडे, दागिणे, फराळ आदी वस्तूंसोबतच फटाक्यांची मागणी प्रचंड प्रमाणात वाढते. ग्रामीण भागातील लहान दुकानदार देसाईगंज येथूनच फटाक्यांची खरेदी करतात. त्याचबरोबर जिल्ह्यातील इतरही दुकानदार फटाके खरेदीसाठी देसाईगंज बाजारपेठेलाच पसंती दर्शवितात. दरवर्षी जवळपास सव्वा ते दीड कोटींचे फटाके विकल्या जात होते. एका फटाके विक्रेत्याचा गल्ला जवळपास ५ ते ७ लाख रूपयांच्या दरम्यान राहत होता. यावर्षी मात्र फटाक्यांच्या विक्रीमध्ये प्रचंड प्रमाणात घट झाली असल्याची माहिती फटाके दुकानदारांनी दिली आहे.
इतर वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाली असली तरी महत्त्वाचे म्हणजे फटाक्यांच्या किमतीमध्ये यावर्षी वाढ झाली नाही. तरीही एकूण विक्री ५० लाखाच्या जवळपासही पोहोचली नाही. कित्येक दुकानदारांना मुद्दलावरच व्यवसाय करावा लागला. अनेक दुकानदारांकडे माल शिल्लक असल्याने त्या दुकानदारांना तोट्याचा सामनाही करावा लागला आहे. काही दुकानदारांनी लाख रूपयांपर्यंतचा गल्ला जमा केला. तर काहींना मात्र ५० हजार रूपयांच्या विक्रीवरच समाधान मानावे लागले आहे.
यावर्षी प्रदूषण मुक्त दिवाळी साजरी करण्याविषयी सामाजिक संस्था, शाळा यांच्या मार्फतीने मोठ्या प्रमाणात जनजागृती करण्यात आली. शालेय विद्यार्थ्यांना फटाके फोडण्याचे होणारे शारीरिक दुष्परिणाम व पर्यावरणाची होणारी हानी याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. फटाक्यांमुळे होणारे अपघातही विद्यार्थ्यांना चित्रफितीद्वारे दाखविण्यात आले. काही सामाजिक व धार्मिक संस्थांनी तर दिवाळीदरम्यान फटाके फोडणे हे कोणत्याही शास्त्रात नाही. ही पाश्चिमात्य पद्धत आहे, अशीही टीका करण्यात आली होती. यामुळे काही मिनिटांच्या आनंदासाठी हजारो रूपये खर्च होण्याबरोबरच पर्यावरणाचे प्रदूषणही होत असल्याचे नागरिकांच्या लक्षात आले. दिवाळीचा आनंद वेगळ्यापद्धतीनेही साजरा करता येतो. हे नागरिकांच्या लक्षात आल्यानेच फटाक्यांची मागणी प्रचंड प्रमाणात घटली असवी, असा अंदाज दुकानदारांकडून व्यक्त केला जात आहे. विक्री कमी झाल्यामुळे फटाका दुकानदारांमध्ये नाराजी पसरली असली तरी जिल्ह्यातील पर्यावरणवाद्यांनी मात्र फटाक्यांच्या नियंत्रित वापरावर समाधान व्यक्त केला आहे.