घरकूल बांधकामात मंदगती
By Admin | Updated: February 25, 2015 01:46 IST2015-02-25T01:46:03+5:302015-02-25T01:46:03+5:30
सर्वसामान्य गरीब दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली.

घरकूल बांधकामात मंदगती
गडचिरोली : सर्वसामान्य गरीब दारिद्र्य रेषेखालील कुटुंबांना हक्काचे घर मिळावे, यासाठी शासनाने इंदिरा आवास योजना कार्यान्वित केली. या योजनेंतर्गत सन २०१४-१५ या वर्षात जिल्हाभरात ७ हजार ७९४ घरकुलाचे काम मंजूर करण्यात आले. मात्र अनेक लाभार्थ्यांचे अद्यापही बँक खाते नाही. तसेच काही कुटुंबांकडे वारसान प्रमाणपत्र नाही. शिवाय रोजगारासाठी अनेक मजूर व कुटुंब बाहेर जिल्ह्यात गेल्यामुळे घरकूल बांधकामाची गती मंदावल्याचे दिसून येत आहे.
मंजूर ७ हजार ७९४ घरकुलांपैकी ७४९ घरकूलाच्या बांधकामाचा आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही शुभारंभ झाला नसल्याची माहिती आहे. त्यामुळे विहीत कालावधीत घरकूल बांधकामाचे १०० टक्के उद्दिष्ट गाठणे जिल्हा विकास यंत्रणेला अशक्यप्राय होणार आहे.
इंदिरा आवास योजनेंतर्गत १२ ही पंचायत समितीमध्ये दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांसाठी १ लाख रूपये किंमतीचे घरकूल मंजूर करण्यात आले. २०१४ च्या जुलै महिन्याच्या अखेरीस सन २०१४-१५ या वर्षातील ७ हजार ७९४ घरकूल बांधकामांना मंजुरी देण्यात आली. आठ महिन्यांचा कालावधी उलटूनही तब्बल ७ हजार ४२ घरकूल अपूर्ण अवस्थेत असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. चालू वर्षातील केवळ ३६३ घरकुलाचे बांधकाम दरवाजास्तरापर्यंत पोहोचले आहे. मात्र छतस्तरापर्यंत एकही घरकूल पोहोचले नसल्याची माहिती आहे. त्यामुळे शासन निर्णयानुसार वर्षभरात पूर्ण करावयाचे घरकूल बांधकाम काही अडचणींमुळे लांबणीवर पडत आहे. घरकूल बांधकामात गती येण्यासाठी पं. स. प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे आवश्यक आहे. (स्थानिक प्रतिनिधी)
७७ कोटी ९४ लाखांचा निधी प्राप्त
इंदिरा आवास योजनेंतर्गत सन २०१४-१५ वर्षात मंजूर करण्यात आलेल्या ७ हजार ७९४ घरकुलांसाठी जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेला शासनाकडून ७७ कोटी ९४ लाख रूपयांचा निधी प्राप्त झाला. यापैकी जिल्हा विकास यंत्रणेने ५० टक्के निधी सर्व पंचायत समित्यांना वितरित केला आहे. पं. स. मार्फत लाभार्थ्यांना निधी वितरित केला जातो.