खर्रा व तंबाखू घोटाई जोरात
By Admin | Updated: May 13, 2015 01:12 IST2015-05-13T01:12:13+5:302015-05-13T01:12:13+5:30
वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे.

खर्रा व तंबाखू घोटाई जोरात
गडचिरोली : वर्षभरापूर्वी राज्य सरकारने गुटखा व सुगंधी तंबाखूजन्य पदार्थावर महाराष्ट्रात बंदी घातली आहे. मध्यंतरीच्या काळात अन्न व औषध प्रशासनाचे सचिव असताना महेश झगडे यांनी गडचिरोलीत येऊन सक्त कारवाई करण्याबाबत प्रशासनाला आदेश दिले होते. मात्र आता अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी तंबाखूजन्य पदार्थ व खर्रा विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यास टाळाटाळ करीत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. जिल्ह्यात राजरोसपणे दररोज सव्वा कोटी रूपयांचा खर्रा विकल्या जात आहे. या खर्ऱ्याचे ग्राहक शाळकरी मुले व महिला व तरूण असल्याने कर्करोगाच्या आजाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. मात्र पोलीस व अन्न औषध प्रशासनाला याचे काहीही सोयरसुतक नसल्याचे दिसून येत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात दारूबंदी असली तरी चोरट्या मार्गाने मोठ्या प्रमाणावर दारू आणली जाते व विकली जाते. त्याच धर्तीवर तंबाखूजन्य पदार्थ व गुटखा आंध्रप्रदेश व छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात तस्करी करण्यात येत आहे. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलीस प्रशासनही या संदर्भात कुठलीही कारवाई करीत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
राज्य शासनाच्या अन्न व औषध प्रशासन विभागाने वर्षभरापूर्वी गुटखा व तंबाखुजन्य पदार्थाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. मात्र गडचिरोलीत कुठेही ही बंदी असल्याचे दिसून येत नाही. छत्तीसगड व आंध्रप्रदेश राज्याच्या सीमेला लागून जिल्ह्याचे अनेक तालुके आहेत. छत्तीसगड राज्याच्या राजनांदगाव, पाखांजूर, धानोरा मार्ग गडचिरोलीत मोठ्या प्रमाणावर सुगंधीत तंबाखूजन्य पदार्थांची तस्करी केली जात आहे. महाराष्ट्रात गुटखा व तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नसतांना या मालाचे होलसेल विक्रेते होतेच. शासनाने बंदी घातल्यावरही याच विक्रेत्यांमार्फत गडचिरोली शहरासह जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात हा माल राजरोसपणे पोहचविला जात आहे. ठराविक दुकानदार गडचिरोली शहरात अशा मंडळींकडे मालासाठी येरझाऱ्या घालत असल्याचे चित्र आहे.
छत्तीसगड व मध्यप्रदेश राज्यात कुठेही सुगंधीत तंबाखुजन्य पदार्थावर बंदी नाही. तेथून कोरची, धानोरा, कुरखेडा आदी भागात माल पाठविला जातो व ग्रामीण भागात तो जुन्याच वितरकांमार्फत पुरवठा केला जातो. त्यामुळे शासनाच्या बंदीला अर्थच उरलेला नाही. उलट शासनाने बंदी केल्यामुळे अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अधिकाऱ्यांची कमाई जोमाने वाढली आहे. (जिल्हा प्रतिनिधी)
जिल्ह्यात खपतो सव्वा कोटींचा खर्रा
गडचिरोली जिल्ह्यात सुगंधी तंबाखु, सुपारी, चुना यांचे मिश्रण करून तयार करण्यात आलेला एक खर्रा साधारणत: १० ते २० रूपयाला विकल्या जातो. एक पानठेला चालक दिवसाला खर्रा बनविण्यासाठी एक किलो सुपारी वापरतो. एक किलो सुपारीच्या माध्यमातून किमान ५० खर्रे तयार केले जातात. एक पानठेला चालक दिवसाला ५०० रूपयाचे खर्रे विकतो. जिल्ह्यात २५ हजार पानठेले चालक असल्याचे पकडले तर दररोजचीही उलाढाल १ कोटी २५ लाख रूपयावर जाते. संपूर्ण जिल्ह्याच्या खर्रा विक्रीचा हा हिशोब कोटीच्या घरात जातो. याचा अर्थ दररोज जिल्ह्यात सव्वा कोटी रूपयाचा खर्रा नागरिक खातात.
सारेच अवैध धंदेवाले पुनर्वसनाची करतात गोष्ट
राज्यात गुटखा बंदीनंतर गडचिरोली जिल्ह्यात अन्न व औषध प्रशासन तसेच पोलीस प्रशासन यांनी खर्रा व गुटखा विक्रेत्यांविरोधात धाडसत्र सुरू केले होते. त्यावेळी जिल्ह्यातील पानठेला व्यावसायिकांनी बंद आंदोलन करून मोर्चाही काढला होता. त्यांच्या समर्थनासाठी विविध राजकीय पक्षांची मंडळी पुढे सरसावली होती. आधी पानठेला विक्रेत्यांचे पुनर्वसन करा, अशी मागणी करीत होते. खर्रा, गुटखा या पदार्थांच्या सेवनामुळे तरूण पिढी, लहान मुले, महिला यांचे जबडे उघडणे कठीण झाले आहे. याची राजकीय पुढाऱ्यांना जाण नाही. जिल्ह्यातील अनेक राजकीय पुढारी व लोकप्रतिनिधी हे डॉक्टर पदवी घेतलेले आहे. तरीही ते अशा व्यावसायिकांचे राजरोस समर्थन करतात, ही अत्यंत चिंतेची बाब आहे.