लाकडी नंदींसाठी झाडांची कत्तल
By Admin | Updated: August 21, 2015 01:59 IST2015-08-21T01:59:39+5:302015-08-21T01:59:39+5:30
पोळा सणासाठी लाकडी नंदीबैल तयार करण्याचे काम सुरू झाले़ मात्र लाकडाचे नंदीबैल तयार करण्याच्या स्पर्र्धेत जंगलातील लाकडाची कत्तल सर्रास सुरू आहे़.

लाकडी नंदींसाठी झाडांची कत्तल
वन विभागाचे दुर्लक्ष : तान्हापोळ्यासाठी ग्रामीण भागातून शहरात तस्करी
देसाईगंज : पोळा सणासाठी लाकडी नंदीबैल तयार करण्याचे काम सुरू झाले़ मात्र लाकडाचे नंदीबैल तयार करण्याच्या स्पर्र्धेत जंगलातील लाकडाची कत्तल सर्रास सुरू आहे़. वनविभागाचे मात्र याकडे दुर्लक्ष होत असल्याने तालुक्यातील जंगलाचे प्रमाण दिवसागणिक कमी होत आहे़
पोळा सणाकरिता नंदी बैलांच्या पूजेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. शहरापासून तर ग्रामीण भागातून नंदी बैलाच्या पूजनाची परंपरा चालत येत आहे़ त्यामुळे लाकडी नंदी बैल हिंदू कुटुंबाकरिता पूजनासाठी अतिशय आवश्यक आहे़ याचाच फायदा घेत संपूर्ण जिल्ह्यात जंगलातील लाकडे चोरट्या वाटेने आणून नंदी बैल तयार करण्याचा सपाटा ग्रामीण भागात सुरू झाला आहे. ग्रामीण भागातून तयार होणाऱ्या नंदी बैलांना शहरात पाच हजारांपासून तर ६० हजारापर्यंत किंमत मिळत आहे़ नंदी बैलापासून मिळणारी किंमत कारागिराचे डोळे विस्फारणारी आहे. जंगलातील चार, सावरी, आंबा व साग या झाडापासून नंदी बैल तयार केले जाते़ यापैकी चाराच्या झाडापासून अतिशय कमी वेळात नंदी बैल तयार केले जाऊ शकते़ साग वृक्षापासून तयार झालेल्या नंदी बैलाला सर्वाधिक किंमत मिळते. जंगलातील लाकडे चोरून त्या पासून कमी वेळात जास्त पैसा कमाविता येऊ शकते़ वनविभागाचे वनरक्षक गावातच राहतात मात्र नंदी बैल कारागिराकडून चोरीच्या लाकडापासून तयार होत असलेल्या नंदी बैलांवर आळा घालण्यास कोणीही धजावत नाहीत़ पूर्वी ठरावीक वृक्षापासूनच नंदी बैल तयार केले जात होते़ मात्र अधिकचा नफा कमाविण्याकरिता कारागिरांकडून वृक्षाची सर्रास कत्तल चालली आहे़ कित्येकांच्या शेतावरील सागाचे झाड यामुळे चोरीला गेले आहे. लाकडी साहित्याची वाहतूक करण्याकरिता वाहतूक परवाना आवश्यक आहे़ लाकडांच्या नंदी बैलाला सुद्धा हा परवाना आवश्यक आहे़ मात्र वनविभागाने अजूनपर्यंत एकाही नंदीबैलाला वाहतूक परवानाकरीता कारवाई केलेली नाही़ वनविभागाच्या दुर्लक्षामुळे कारागिराचे मनोबल वाढले. (वार्ताहर)