सहा हजारांवर विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त

By Admin | Updated: August 24, 2016 02:10 IST2016-08-24T02:10:37+5:302016-08-24T02:10:37+5:30

राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत इयत्ता पहिली

Six thousand students vacancies vacant | सहा हजारांवर विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त

सहा हजारांवर विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त

२४ शासकीय आश्रमशाळेतील स्थिती : इंग्रजी माध्यमांच्या कॉन्व्हेंटचा परिणाम
दिलीप दहेलकर गडचिरोली
राज्याच्या आदिवासी विकास विभागाच्या गडचिरोली एकात्मिक आदिवासी प्रकल्पाअंतर्गत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या शिक्षणाची सोय असलेल्या एकूण २४ शासकीय आश्रमशाळांची मंजूर विद्यार्थी प्रवेश क्षमता १३ हजार २५० इतकी आहे. यापैकी यंदाच्या शैक्षणिक सत्रात ६ हजार ८९५ विद्यार्थी प्रवेशित झाले. २४ शासकीय आश्रमशाळांमधील तब्बल ६ हजार ४०५ विद्यार्थ्यांच्या जागा रिक्त आहेत. इंग्रजी माध्यमांच्या वाढत्या कॉन्व्हेंटमुळे आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर मोठा परिणाम होत आहे.
गडचिरोली प्रकल्पाअंतर्गत कुरखेडा, चामोर्शी, धानोरा, कोरची, गडचिरोली व आरमोरी या सहा तालुक्यांमध्ये एकूण २४ शासकीय आश्रमशाळा आहेत. यामध्ये येंगलखेडा, रेगडी, सावरगाव, मुरूमगाव, गोडलवाही, मार्र्कंडादेव, पोटेगाव, गडचिरोली, पेंढरी, रांगी, भाकरोंडी, कारवाफा, सोडे, रामगड, गॅरापत्ती, पुराणी माल, भाडभिडी, सोनसरी, अंगारा, मसेली, घाटी, कोरची, येरमागड व कोटगूल आदी आश्रमशाळांचा समावेश आहे.
शासन निर्णयानुसार शासकीय आश्रमशाळेत इयत्ता पहिली ते बारावीपर्यंतच्या कोणत्याही वर्गाची विद्यार्थी प्रवेश क्षमता ५० ठेवण्यात आली आहे. यामध्ये ४० विद्यार्थी हे आश्रमशाळेत निवासी राहणारे व १० बहिस्थ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. गडचिरोली प्रकल्पातील २४ शासकीय आश्रमशाळांमध्ये ६ हजार ४२५ मुले व ६ हजार ८२५ मुली असे एकूण १३ हजार २५० विद्यार्थी प्रवेश क्षमता आहे. सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात ५ हजार ९५२ निवासी विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. तर ९४३ बहिस्थ विद्यार्थ्यांचे प्रवेश करण्यात आले आहे. २४ आश्रमशाळांमध्ये एकूण ६ हजार ८९५ विद्यार्थी प्रवेशित झाले आहेत. ४ हजार ६८८ निवासी व १ हजार ७१७ असे एकूण ६ हजार ४०५ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिक्त राहिले आहेत. इयत्ता पहिली ते सातवीपर्यंतच्या वर्गात ५ हजार २१३, इयत्ता ८ ते १० पर्यंतच्या वर्गात ७५९ विद्यार्थ्यांचे प्रवेश रिक्त आहेत. इयत्ता ११ वी व १२ वीचे कला शाखेचे एकूण १५५ व विज्ञान शाखेचे २७८ विद्यार्थ्यांचे प्रवेश यंदाच्या शैैक्षणिक सत्रात रिक्त राहिले आहेत.
दुर्गम व ग्रामीण भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना निवासी राहून शिक्षण घेता यावे, यासाठी राज्याच्या आदिवासी विकास विभागाने गडचिरोली जिल्ह्यात शासकीय आश्रमशाळा सुरू केल्या. सुरुवातीच्या काही वर्षात शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे १०० टक्के प्रवेश पूर्ण होत होते. मात्र गेल्या ५ ते ६ वर्षांपासून आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांचे प्रवेशाच्या जागा रिक्त राहत आहेत. इंग्रजी माध्यमांचे कॉन्व्हेंट व मोठ्या शाळा गल्लीबोळात सुरू करण्यात आले. याचा परिणाम शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्येवर होत आहे.

गडचिरोली प्रकल्प कार्यालयाच्या वतीने सन २०१६-१७ या शैक्षणिक सत्रात गतवर्षीच्या तुलनेत सर्व २४ शासकीय आश्रमशाळा मिळून २०० विद्यार्थी प्रवेशवाढीबाबतचे उद्दिष्ट होते. सदर उद्दिष्ट पूर्ण करण्याच्या दृष्टिकोेनातून आश्रमशाळेचे सर्व मुख्याध्यापक व शिक्षकांना वारंवार सूचना देण्यात आल्या. बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. शिक्षकांतर्फे गावभेटी कार्यक्रम राबविण्यात आला. आदिवासी विकास विभागाच्या योजनांची माहिती दुर्गम गावांपर्यंत पोहोचविण्यात आली. त्यामुळे यंदा शाळेच्या पहिल्या दिवशी सर्व आश्रमशाळांमध्ये विद्यार्थ्यांची ५७ टक्के उपस्थिती होती. प्रकल्पातील १० आश्रमशाळांमध्ये डिजिटल क्लासरूम करण्यात आली आहे. त्यामुळे गतवर्षीच्या तुलनेत यंदा ५० विद्यार्थ्यांचे प्रवेश अधिक झाले आहेत.
- विकास राचेलवार, सहायक प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, गडचिरोली

इंग्रजी माध्यमाचे पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करणे आवश्यक
जिल्हा परिषदेच्या मराठी माध्यमाच्या प्राथमिक शाळेत चवथीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर बहुतांश विद्यार्थी पालकांच्या आग्रहाखातर इयत्ता पाचवीत सेमी इंग्लिश अथवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये प्रवेश घेतात. शासकीय आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढविण्यासाठी सर्वच आश्रमशाळेत इंग्रजी माध्यमाचे पूर्व प्राथमिक वर्ग सुरू करणे गरजेचे आहे. आश्रमशाळांमध्ये तीन ते साडेतीन वर्ष वयाच्या बालकांपासून इंग्रजी माध्यमांच्या शिक्षणाची सुविधा झाल्यास आश्रमशाळेतील विद्यार्थी पटसंख्या वाढण्यास मदत होईल. त्यादृष्टीने राज्याच्या आदिवासी विकास विभागाने ठोस पावले उचलणे गरजेचे आहे.

Web Title: Six thousand students vacancies vacant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.