नागेपल्ली व कढोलीतील अपघातात सहा जण जखमी

By Admin | Updated: January 29, 2016 04:31 IST2016-01-29T04:31:19+5:302016-01-29T04:31:19+5:30

अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे ट्रॅक व मिनी ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन तीन जण या अपघातात गंभीर

Six people were injured in an accident in Nagespally and Kadoli | नागेपल्ली व कढोलीतील अपघातात सहा जण जखमी

नागेपल्ली व कढोलीतील अपघातात सहा जण जखमी

अहेरी/वैरागड : अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथे ट्रॅक व मिनी ट्रक यांची समोरासमोर धडक होऊन तीन जण या अपघातात गंभीर तर कुरखेडा तालुक्यातील कढोली येथील वळणावर ट्रॅक्टर उलटल्याने तीन जखमी झाल्याची घटना गुरूवारी घडली.
अहेरी तालुक्यातील नागेपल्ली येथील वन विभागाच्या मुख्य कार्यालयासमोर गुरूवारी सकाळी ११ वाजता ट्रक व मिनी ट्रकची समोरासमोर धडक होऊन तीन जण जखमी झाल्याची घटना घडली.
मिनी ट्रक क्रमांक एमएच ३४-एव्ही ०९८० चंद्रपूरवरून आलापल्लीकडे ब्रेड व केक घेऊन येत होता. त्याचवेळी विरूध्द दिशेने येणाऱ्या ट्रक क्रमांक एमएच ३१ सीबी १८६५ ने ट्रकने मिनी ट्रकला जोरदार धडक दिली. यात मिनी ट्रकचा पुढील भाग पूर्णत: चेंदामेंदा झाला. या अपघातात यातील छोटू मंडल (३५), प्रशांत पाल (३०), देवा रॉय (२५) रा. सर्व चंद्रपूर हे गंभीर जखमी झाले. तत्काळ १०८ रूग्णवाहिकेला बोलावून जखमींना अहेरी उपजिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे. १०८ चे वैद्यकीय अधिकारी त्रिवेंद्र कटरे यांनी घटनास्थळी जखमींवर प्राथमिक उपचार केले. अपघातानंतर ट्रकचा चालक ट्रक सोडून पसार झाला. घटनास्थळी पोलीस निरिक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल गजानन कोंडागुर्ले यांनी भेट देऊन अपघाताची माहिती घेतली.
दुसऱ्या एका अपघातात कढोली व वाढोणा येथून वैरागड मार्गे भूईमुगाच्या शेंगा घेऊन जाणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली पलटल्याने झालेल्या अपघातात तीन जण गंभीररित्या जखमी झाले. ही घटना कढोली गावाजवळील वळणावर दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कढोली येथील एकनाथ सोनुले यांचा ट्रॅक्टर क्र. एमएच-३३-२२०८ ने कढोली वाढोणा येथील शेतकऱ्याच्या भूईमुगााच्या शेंगा आरमोरी कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्रीसाठी नेण्यात येत होत्या. भरधाव वेगात असलेल्या ट्रॅक्टरच्या चालकाचे वळणावर वाहनावरील नियंत्रण सुटले. या अपघातात नथ्थू नारनवरे (६५) रा. कढोली, श्यामसुंदर गरमळे (४५) रा. वाढोणा, चिमन बहारदेवे (२५) रा. कढोली हे गंभीररित्या जखमी झाले तर इतर सहा जणांनी ट्रॅक्टर ट्रॉलीवरून उडी घेतल्याने ते बचावले. जखमींना आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक ए. बी. बच्चलवार, उपनिरीक्षक दाभाडे, हवालदार देवराव सहारे यांनी घटनास्थळी धाव घेतली. (वार्ताहर)

Web Title: Six people were injured in an accident in Nagespally and Kadoli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.