सहा लाखांची छत्तीसगडी दारू जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2019 22:41 IST2019-06-27T22:41:00+5:302019-06-27T22:41:47+5:30
छत्तीसगड राज्यातून येणाºया बॉम्बे रॉयल कंपनीच्या व्हिस्कीच्या सहा लाख रुपये किमतीच्या बाटल्या गडचिरोली पोलीस ठाण्यातील कर्मचाºयाच्या दक्षतेमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी चातगाव-रांगी मार्गावर करण्यात आली. टाटा पीकअप या मालवाहू वाहनातून ही दारू गडचिरोलीकडे येत होती.

सहा लाखांची छत्तीसगडी दारू जप्त
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : छत्तीसगड राज्यातून येणाऱ्यां बॉम्बे रॉयल कंपनीच्या व्हिस्कीच्या सहा लाख रुपये किमतीच्या बाटल्या गडचिरोली पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांच्या दक्षतेमुळे पकडण्यात पोलिसांना यश आले. ही कारवाई बुधवारी चातगाव-रांगी मार्गावर करण्यात आली. टाटा पीकअप या मालवाहू वाहनातून ही दारू गडचिरोलीकडे येत होती.
प्राप्त माहितीनुसार, गडचिरोली पोलीस ठाण्याचे हवालदार विनोद दुग्गा हे दुचाकीने आपल्या गावाकडून गडचिरोलीकडे येत असताना जीमगाव टी पॉईंटजवळ त्यांना एमएच २७, बीएक्स २११६ हे मालवाहू वाहन संशयास्पद वाटले. त्यांनी वाहनाला थांबण्यासाठी हात दाखविला असता वाहन चालक आणि त्याचा सहकारी वाहन उभे करून पसार झाले. दुग्गा यांनी वाहनाची तपासणी केली असता त्यात दारूच्या बाटल्यांचे १२५ बॉक्स असल्याचे आढळले. त्यांनी लगेच याबाबतची माहिती गडचिरोली पोलीस ठाण्याला दिली. पोलीस उपनिरीक्षक तेजस्वी पाटील यांनी इतर सहकाऱ्यांसह घटनास्थळी जाऊन पंचनामा केला आणि वाहन जप्त केले. अज्ञात वाहन चालक व त्याच्या सहकाºयाविरूद्ध दारूबंदी कायद्यान्वये गुन्हे दाखल करण्यात आले. ही कारवाई ठाणेदार पी.व्ही.चौगावकर यांच्या मार्गदर्शनात पीएसआय पाटील, हवालदार भास्कर चंदनखेडे, भारत रामटेके, विनाद दुग्गा, नायक दिलीप गावडे, चालक गलगट यांनी केली.
गडचिरोलीत तयार होते ब्रँडेड कंपनीची बनावट दारू
शहरात पुन्हा दारूची आवक वाढत आहे. विशेष म्हणजे छत्तीसगडमधून हलक्या प्रतिची दारू आयात करून ती नामांकित कंपनीच्या बाटल्यांमध्ये भरून नव्याने लेबल लावून विकल्या जात आहे. सदर प्रकरणात पोलिसांनी पकडलेली ‘बॉम्बे रॉयल’ ही विस्की त्यासाठीच गडचिरोलीकडे येत होती अशी माहिती सूत्रांनी दिली. ही दारू गडचिरोलीतील एका बड्या दारू विक्रेत्याकडे येत असल्याचे समजते. वाहन चालक किंवा त्याचा सहकारी पोलिसांच्या हाती लागले नसले तरी वाहनाच्या नंबरवरून, चेसिस नंबरवरून खऱ्या आरोपीचा माग घेणे पोलिसांना सहन शक्य आहे. दरम्यान या प्रकरणाचा तपास करणारे एपीआय किरण देशमुख यांना त्याबाबत विचारणा करण्यासाठी मोबाईलवर संपर्क केला असता त्यांनी कॉल स्वीकारला नाही. त्यामुळे या प्रकरणात खोलात पोलीस जाणार का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे.